सातारा – जिल्ह्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जून महिन्यातच कास धरण तसेच वेण्णा लेक तुडुंब भरून वाहत असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. हे दोन्ही पिण्याच्या पाण्याचे स्रोत असल्याने साता-यासह महाबळेश्वर-पाचगणीकरांना पाणीटंचाई भेडसावणार नाही. जून महिन्यातच पाणीप्रश्न संपुष्टात येण्याची किमया ब-याच वर्षांनी घडली आहे.
महाबळेश्वरमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे वेण्णा तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. हा तलाव महाबळेश्वर आणि पाचगणी शहराची जीवनदायिनी मानला जातो. या तलावामधून महाबळेश्वर आणि पाचगणीला पाणीपुरवठा केला जातो. वेण्णा तलाव शनिवारी पूर्ण क्षमतेने भरल्याने तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे महाबळेश्वर आणि पाचगणी शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
कास धरणही पूर्ण क्षमतेने भरले – सातारा शहराची ‘लाईफलाईन’ असणारे कास धरण पहिल्यांदाच जून महिन्यात पूर्ण क्षमतेने भरले आहे. तलावामध्ये सध्या ६० फूट इतका पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे सातारकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. त्यामुळे पाणी कपात लवकरच मागे घेतली जाणार आहे. पश्चिम घाट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने कास धरणाच्या नव्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे.
वर्षभराचा पाणीप्रश्न संपुष्टात
कास धरणात झालेला अर्धा टीएमसी पाणीसाठा हा सातारकरांना वर्षभर पुरतो. धरणाचा नवा सांडवा हा भुशी डॅमसारखा आहे. धरणाच्या सांडव्यावरून वाहणा-या पाण्यामुळे कास धरणाला भुशी डॅमचा फील आला आहे. हे नयनरम्य सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची कास परिसरात गर्दी होऊ लागली आहे.