सातारा : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज सातारा शहरातील गांधी मैदानावर सायंकाळी सात वाजता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्याला अवघे काही तास उरलेले असताना शिवसेनेत राजीनामास्त्राने खळबळ उडाली आहे. शहरप्रमुख नीलेश मोरे यांच्यासह बूथ प्रमुखांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत, त्यामुळे सातारा शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे.
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झालेल्या जिल्हा परिषद सदस्यांचा सत्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज सातारा येथे करण्यात येणार आहे. तसेच, कोरेगावमध्ये अंगापूर येथील कार्यक्रमात शिंदे सहभागी होणार आहेत. त्यानंतर ते साता-यात रात्री होणा-या मेळाव्याला संबोधित करणार आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या दौ-यापूर्वीच सातारा शहरातील शिवसेनेत मोठे बंड उफाळले आहे. शहरप्रमुख नीलेश मोरे यांनी संपर्कप्रमुखांच्या कार्यपद्धतीवर नाराज होत राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबत शहरातील बूथप्रमुखांनीही सामूहीक राजीनामे दिले आहेत, त्यामुळे उपमुख्यमंत्री साता-यात येण्याच्या अगोदरच एक विकेट पडली आहे.
नीलेश मोरे यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात संपर्कप्रमुखांच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कार्यकर्त्यांनी जीव तोडून काम करायचे आणि श्रेय-निधी मात्र नातेवाईकांना? असा थेट सवाल मोरे यांनी केला आहे. विकास निधीच्या वाटपातील पक्षपात, जिल्हा नियोजन समितीतून ऐनवेळी नाव कट होणे आणि सातत्याने डावलण्यात येत आहे, असा आरोप मोरे यांनी केला आहे.
भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची ताकद निर्माण करण्यासाठी झटलेल्या कार्यकर्त्यांनाच दुय्यम वागणूक मिळत असेल, तर निष्ठा ठेवून काय उपयोग? असा जाहीर सवाल मोरे यांनी उपस्थित केला आहे.
















