27 C
Latur
Friday, March 6, 2026
Homeमहाराष्ट्रसाता-यात ‘सूर्या’ची एक्झिट ; पोलिस दलावर शोककळा

साता-यात ‘सूर्या’ची एक्झिट ; पोलिस दलावर शोककळा

शासकीय इतमामात झाले अन्त्यसंस्कार

सातारा : प्रतिनिधी
सातारा पोलिस दलाच्या बॉम्­बशोधक पथकातील ‘सूर्या’ श्वानाचा मंगळवारी हृदयविकाराने मृत्यू झाला. शासकीय इतमामात मानवंदना देऊन ‘सूर्या’वर अन्त्यसंस्कार करण्यात आले. झारखंडमधील ऑल इंडिया ड्युटी मीट स्­पर्धेत सूर्याने सुवर्णपदक पटकावत सातारा जिल्हा पोलिस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला होता.

मंगळवारी सकाळी सूर्याचे हॅण्­डलर (सांभाळ करणारे पोलिस) सागर गोगावले आणि निलेश दयाळ त्­याचे खाद्य घेऊन गेले होते. त्यावेळी सूर्या कळवळून बेशुद्ध पडला. दोन्­ही हॅण्­डलरनी त्­याला जागे करण्याचा प्रयत्­न केला. त्याच्यावर प्रथमोपचारही केले. मात्र, सूर्याने कसलाही प्रतिसाद दिला नाही. पोलिसांनी त्याला पशुवैद्यकीय अधिका-यांकडे नेले. डॉक्टरांनी तपासणी करून हृदयविकाराच्या झटक्याने सूर्याचा मृत्­यू झाल्याचे सांगितले.

शासकीय इतमामात अन्त्यसंस्कार
सूर्याच्या मृत्यूची बातमी वा-यासारखी पसरल्यानंतर पोलिस दलावर शोककळा पसरली. साता-याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांनी पुष्पचक्र अर्पण करून सूर्याला श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर शासकीय इतमामात सूर्यावर अन्त्यसंस्कार करण्यात आले.

आठ वर्षे पोलिस दलाची सेवा
सूर्या हा मंगळवारी सकाळपर्यंत ठणठणीत होता. सोमवारी वीर धरणासह अनेक ठिकाणी हॅण्डलरसोबत त्याने कर्तव्य बजावले होते. अवघ्या ४५ दिवसांचा असताना सूर्याला पुण्यातून सातारा पोलिस दलात आणले होते. गेली आठ वर्षे त्याने सातारा पोलिस दलाची सेवा केली. वयाच्या ८व्या वर्षी त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला.

सूर्याने अशी बजावली होती कामगिरी
२०१७ : चंदिगड येथे सुवर्ण पदक
२०२३ : पुणे ग्रामीण येथे रौप्य पदक
२०२४ : कोल्हापूर रेंजमध्ये रौप्य पदक
२०२४ : महाराष्ट्र पोलिस कर्तव्य मेळाव्यात रौप्य पदक
२०२५ : झारखंडमधील ऑल इंडिया ड्युटी मीटमध्ये सुवर्ण पदक

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR