मुंबई : डिजिटल सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासाठी व सर्वांसाठी सुरक्षित सायबर व्यवहार निर्माण करण्यासाठी डेटा सिक्युरिटी कॉन्सिल ऑफ इंडियामार्फत २५ सप्टेंबर २०२५ रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज येथे ‘रिंग द बेल फॉर सिक्युरिटी’ या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानातून देशव्यापी सायबर सुरक्षा जनजागृती महिना राबविण्यात येणार आहे.
या अभियानाचे उद्घाटन माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते होणार असून, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, तसेच गृहमंत्रालय, क्रेट-इन, सेबी आणि बीएसई यांचे मान्यवर या वेळी उपस्थित राहणार आहेत.
हे अभियान गृहमंत्रालयाच्या इंडिया सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, क्रेट-इन यांच्या सहकार्याने राबवले जात असून, उद्योगक्षेत्रातील भागीदार संस्थांनी या उपक्रमात योगदान दिले आहे.
हे अभियान नागरिक, संस्था व भागधारकांना सायबर सुरक्षिततेच्या चांगल्या सवयी आत्मसात करण्यास, सायबर सुरक्षा व गोपनीयतेच्या सर्वोत्तम पद्धती स्वीकारण्यास प्रोत्साहित करणार आहे. त्याचबरोबर, वाढत्या सायबर गुन्ह्यांविषयी नागरिकांना माहिती दिली जाईल आणि ऑनलाईन सुरक्षित राहण्याबद्दल मार्गदर्शन केले जाईल.
















