22.2 C
Latur
Monday, January 12, 2026
Homeमहाराष्ट्रसारंगखेड्यात रंगला घोडा-बुलेटच्या शर्यतीचा थरार

सारंगखेड्यात रंगला घोडा-बुलेटच्या शर्यतीचा थरार

नंदूरबार : प्रतिनिधी
सारंगखेडा घोडे बाजारात एक वेगळाच थरार पाहायला मिळाला. बाजाराचे मुख्य आकर्षण ठरले ते घोडा आणि बुलेट मोटारसायकल यांच्यात घेतलेल्या थरारक शर्यतीचे. गर्दीने खचाखच भरलेल्या पटांगणात ही अनोखी रेस पाहण्यासाठी हजारो अश्वशौकिनांची चांगलीच उत्सुकता पाहायला मिळाली. यावेळी अश्वशौकिनांनी मोठी गर्दी केली होती. या शर्यतीत वेगळीच रंगत आली.

शर्यत सुरू होताच अश्व प्रेमींनी प्रचंड जल्लोष केला. एका बाजूला इंजिनचा गडगडाट आणि दुस-या बाजूला धावणा-या घोड्यांची धमक, अशा वातावरणात ही रोमांचक रेस पार पडली. शेवटी घोड्यांनी आपला नैसर्गिक वेग आणि दमदार ताकद दाखवत बुलेटला मागे टाकत बाजी मारली.

घोडे बाजारात आधीच भरगच्च गर्दी होती. त्यातच रेस पाहण्यासाठी अश्वशौकीन, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांची मोठी उत्सुकता दिसून आली. घोड्याचा वेग प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळावी, म्हणून अनेकांनी रेस करण्याची मागणी आयोजकांकडे केली. अखेर आयोजकांनी परवानगी दिल्यावर घोडा-बुलेट शर्यतीची ‘फॅन क्रेझ’ अक्षरश: उसळली. रेस सुरू होताच मैदानात जल्लोष, शिट्टया, टाळ््या असा उत्साह ओसंडून वाहू लागला. घोड्यांच्या नैसर्गिक वेगाच्या आणि पराक्रमाच्या प्रदर्शनामुळे ही शर्यत सारंगखेडा घोडे बाजारातील यंदाच्या सत्रातील हायलाइट ठरली.

दरम्यान, सारंगखेडाचा चेतक फेस्टिव्हल ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्था म्हणून ओळखला जात आहे. या घोडे बाजारातून दरवर्षी शंभर कोटीची उलाढाल होत असते. यामुळे चेतक फेस्टिव्हल महाराष्ट्रातला सर्वात मोठा महोत्सव म्हणून प्रसिद्ध होत आहे. सारंगखेडाच्या यात्रेत सर्व प्रकारचे घोडे येत असतात. यात प्रामुख्याने घोड्यांच्या स्पर्धा होत असतात. घोडा हा शुभ लक्षण आहे. यामुळे अनेक शौकीन आपल्या घरासमोर घोडा ठेवत असतात तर आणि घोडे अश्वसंयोगाचा व्यवसायदेखील होत असतो. या चेतक फेस्टिव्हलमध्ये ५० हजारांपासून तर ११ करोडपर्यंतचे घोडे येत असतात. यावेळीही त्याची प्रचिती आली. यामुळे ही यात्रा अश्वशौकीनांसाठी एक पर्वणीच असते.

‘वेगवान राणी’ची धमाकेदार बाजी
वेगाचे प्रतिक म्हणून ओळखल्या जाणा-या घोड्यांनी या रेसमध्ये पुन्हा एकदा सिद्ध केले की, त्यांचा वेग कोणत्याही यंत्रमानवावर भारी आहे. या शर्यतीत मध्य प्रदेशातील महेश्वर येथील यादव स्टड फार्मची ‘वेगवान राणी’ नावाची घोडी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. या घोडीने बुलेटसोबत रेसिंग ट्रॅकवर दमदार स्पर्धा देत शर्यतीत विशेष कामगिरी बजावली. वा-याच्या वेगाने घोडी धावत होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR