पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानांमुळे सध्या मानहानीच्या खटल्याचा सामना करत असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी कोर्टामध्ये निवेदन देत आपल्या जीवितास धोका असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. यामध्ये महात्मा गांधी यांच्या झालेल्या हत्येचा उल्लेख करत राहुल गांधी यांनी इतिहासाला त्याची पुनरावृत्ती करण्याची संधी मिळता कामा नये, असेही या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनामध्ये राहुल गांधी म्हणाले की, हल्लीच्या काळात मी ज्या राजकीय मुद्यांबाबत आवाज उठवला आहे. तसेच याआधी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत ज्या टिप्पण्या केल्या आहेत. त्यामुळे माझ्या सुरक्षेला असलेला धोका वाढला आहे. या खटल्यातील तक्रारदार हे नथुराम गोडसे यांचे थेट वंशज आहेत. तक्रारदाराच्या कुटुंबाची हिंसा आणि असंवैधानिक कृत्यांशी संबंधित कारवायांचा इतिहास कागदपत्रांमधून उपलब्ध आहे. राहुल गांधी यांनी पुढे सांगिलते की, मला हानी पोहोचवली जाऊ शकते, अशी मला स्पष्ट आणि तार्किक शंका आहे.
मला खोट्या प्रकरणात अडकवले जाऊ शकते किंवा अन्य मार्गांनी लक्ष्य केले जाऊ शकते. तक्रारदाराच्या कुटुंबाला हिंसाचाराची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे इतिहासाला त्याची पुनरावृत्ती करण्याची परवानगी मिळता कामा नये असे राहुल गांधी यांना महात्मा गांधी यांच्या हत्येचा संदर्र्भ देत सांगितले.
विरोधक संतप्त आहेत : राहुल गांधी
मी केलेल्या मत चोरीच्या आरोपांमुळे माझे राजकीय विरोधक संतप्त झाले आहेत. भाजपाकडून मला दोन वेळा सार्वजनिकरीत्या धमक्या मिळाल्या आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी मला देशातील पहिल्या क्रमांकाचा दहशतवादी म्हटले आहे. तर भाजप नेते तरविंदर सिंह मारवाह यांनीही मला धमकी दिली आहे असा दावा राहुल गांधी यांनी केला. तसेच खरोखरच धोका असल्याने आपल्या सुरक्षेच्या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करण्यात यावा, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली.

