शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
‘साहित्यकांनी सत्तेच्या मागे धावण्यापेक्षा सत्याच्या बाजूने ठाम उभे राहिले पाहिजे. समाजातील वास्तव, प्रश्न आणि वेदना प्रामाणिकपणे मांडण्याचे काम साहित्याने करावे,’ असे स्पष्ट मत जेष्ठ विचारवंत प्राचार्य नागोराव कुंभार यांनी व्यक्त केले.
श्री अनंतपाळ नवयुवक वाचनालयाच्या वतीने शिरूर अनंतपाळ येथील शिवराज पाटील समिती साहित्य नगरीत आयोजित जिल्हास्तरीय ग्रंथ रसिक संमेलनात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. प्रसिद्ध समीक्षक प्रा. रणजित शिंदे यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन झाले. स्वागताध्यक्ष एल.बी.आवाळे, शिक्षण तज्ज्ञ प्रभाकरराव कुलकर्णी, पूर्वाध्यक्ष प्रा. देविदास फुलारी, धनंजय गुडसूरकर, डॉ. मंजुषा कुलकर्णी, साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य प्रा. श्रीधर नांदेडकर, जि. प. चे माजी उपाध्यक्ष अॅड. संभाजी पाटील, सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे, डॉ. गजानन कोटवार, डॉ.राजकुमार बोपलकर,बालाजी येरोळे, काशिनाथ बोडके उपस्थित होते.
प्रारंभी सकाळी शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. यात श्री अनंतपाळ नुतन विद्यालय, श्री मन्मथस्वामी विद्यालय, जि. प. शाळा भोजराज नगर, जि. प. शाळा शिरूर अनंतपाळच्या सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या ग्रंथदिंडीचे बसवेश्वर चौकात नगराध्यक्षा चंद्रकला शिवणे व उपनगराध्यक्ष अनंत काळे यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यात विविध पोशाखातील विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले होते. स्थानिकपण पुसले जाणे ही चिंतेची बाब असते, सारे एकाच आकाराचे किंवा सपाटीकरण झालेले असावी ही अपेक्षा चुकीची आहे. जागतिकीकरणाला शरण जाणारी पिढी एकार्ती आहे, या पिढीला आकार देण्याची गरज आहे. छोट्या संमेलनाच्या माध्यमातून साहित्याचा प्रचार व प्रसार प्रभावीपणे होतो आहे. त्यामुळे छोटी संमेलने परिणामकारक होत आहेत असे प्रतिपादन प्रा.रणधीर शिंदे कोल्हापूर यांनी व्यक्त केले.
यावेळी डॉ. मंजुषा कुलकर्णी, अॅड. संभाजीराव पाटील, श्रीधर नांदेडकर, गजानन कोटावर यांनी मनोगत व्यक्त केले. दगडू लोमटे, फ. म. शहाजीदे, प्रविण बिरादार यांना श्री.अनंतपाळ साहित्य सन्मान देऊन गौरव करण्यात आला. स्वागताध्यक्ष एल. बी. आवाळे यांनी प्रास्ताविकेतून साहित्य संमेलनाचा हेतू विषद केला. सुत्रसंचालन डॉ. डि. के. धुमाळे यांनी केले. तर आभार इंजि.किरण कोरे यांनी मानले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह विद्यार्थी व साहित्य प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

