पुणे : प्रतिनिधी
सामाजिक आणि डिजिटल क्षेत्रात विविध पिढ्यांतील लेखिकांनी एकत्र येऊन अनुभवांची देवाणघेवाण करणे आवश्यक आहे. म्हणून स्त्रीवादी साहित्य संमेलनातून ज्येष्ठ आणि नवोदित लेखिकांमध्ये संवाद घडवून स्त्रीच्या अभिव्यक्तीला बळ देण्याचा प्रयत्न आहे यासाठी स्त्रीवादी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे असे विधान परिषद सदस्या तथा माजी उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
महाराष्ट्र साहित्य परिषद, समर्थ युवा फाउंडेशन, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि स्त्री आधार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी स्त्रीवादी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरातील जोशी सभागृह, येथे सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत हे संमेलन होणार आहे. शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीनिमित्त आयोजित करण्यात येत असलेल्या ९९ नांदी संमेलनांच्या उपक्रमांतर्गत हे संमेलन होत आहे.
ज्येष्ठ लेखिका डॉ. छाया महाजन संमेलनाध्यक्ष आहेत.उद्घाटन सत्रासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांना निमंत्रित करण्यात आले आहे. संमेलनस्थळी स्त्री लेखिकांचे जीवनचरित्र आणि साहित्यिक योगदान उलगडणारे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे.सुमारे २०० निमंत्रित प्रतिनिधींमध्ये लेखिका, प्राध्यापिका, कार्यकर्त्या आणि लेखनाची आवड असलेल्या महिलांचा समावेश असेल.
















