30.4 C
Latur
Friday, February 13, 2026
Homeमहाराष्ट्रसाहित्य संवर्धन आघाडीचा जाहीरनामा

साहित्य संवर्धन आघाडीचा जाहीरनामा

पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कारभार अधिक पारदर्शक, लोकाभिमुख आणि सर्वसमावेशक करण्याच्या उद्देशाने ‘साहित्य संवर्धन आघाडी’ने निवडणूक जाहीरनामा तयार केला आहे साहित्य चळवळीला व्यापक सामाजिक अधिष्ठान मिळावे, वाचनसंस्कृती बळकट व्हावी आणि नव्या पिढीला मराठीशी जोडण्याचे काम प्रभावीपणे व्हावे, यासाठी ठोस आणि कृतिशील कार्यक्रम राबवण्याचा निर्धार या जाहीरनाम्यात व्यक्त करण्यात आला आहे.

जाहीरनाम्यानुसार महाराष्ट्र साहित्य परिषदेचा संपूर्ण कारभार घटनात्मक चौकटीत, पारदर्शक आणि पद्धतीने चालवला जाईल. राज्यभरातील परिषदेच्या जिल्हा शाखांना सक्षम करण्यासाठी दरवर्षी ठराविक आर्थिक मदत दिली जाईल. या निधीतून स्थानिक पातळीवर साहित्यिक उपक्रम, वाचन चळवळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यास प्रोत्साहन मिळेल.

दरवर्षी एका जिल्ह्यात विभागीय साहित्य संमेलन आयोजित करून स्थानिक लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा जाहीरनाम्यात उल्लेख आहे. युवा लेखकांना योग्य दिशा देण्यासाठी लेखन कार्यशाळा, संवाद सत्रे आणि मार्गदर्शन शिबिरे शाखांमार्फत राबवली जातील.
परिषदेमार्फत घेतल्या जाणा-या मराठी भाषेच्या परीक्षांना राज्य शासनाची मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील. विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी शाळा व महाविद्यालयांशी समन्वय साधला जाईल. परिषदेच्या वास्तूसाठी अधिक जागा मिळवण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, तसेच आर्थिक स्वावलंबनासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्यावर भर दिला जाईल.

आजीव सदस्यांना ग्रंथप्रकाशन व अन्य उपक्रमांसाठी सभागृह अत्यल्प शुल्कात उपलब्ध करून देण्याचा निर्णय जाहीरनाम्यात आहे. ‘साहित्य पत्रिका’ पुन्हा मुद्रित स्वरूपात प्रत्येक आजीव सदस्यापर्यंत पोहोचवली जाईल. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तो सार्थ ठरेल असे कृतिशील कार्यक्रम राबवले जातील, असेही नमूद करण्यात आले.

‘पुणे पुस्तक महोत्सवा’ला मिळणा-या प्रतिसादाचा उल्लेख करत, १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने १०० पुस्तक महोत्सव आयोजित करण्याचे नियोजन जाहीर झाले आहे. ‘जिथे मराठी तेथे साहित्य परिषद’ या संकल्पनेतून जगभरातील मराठी माणसाला मराठीशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. साहित्यनिर्मितीमध्ये लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवणे, परप्रांतीयांमध्ये मराठीविषयी आस्था निर्माण करणे आणि लेखक, वाचक, प्रकाशक, वितरक व विक्रेते या सर्व घटकांसाठी सक्रिय भूमिका घेण्याचा निर्धार आघाडीने व्यक्त केला आहे. या निवडणुकीत ‘साहित्य संवर्धन आघाडी’कडून अध्यक्षपदासाठी योगेश सोमण, प्रमुख कार्यवाहपदासाठी स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्षपदासाठी प्रदीप निफाडकर हे उमेदवार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR