मुंबई : वृत्तसंस्था
चीन आणि पाकिस्तान भारताविरोधात रहस्यमयपणे इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्धाची तयारी करत आहेत का? अशी शंका निर्माण झाली आहे. भारताने मुंबई फ्लाइट इन्फॉर्मेशन रिजनमध्ये जीपीएस हस्तक्षेपाबाबत एक ‘नोटाम’ जारी केला. जो अरबी समुद्रापर्यंत पसरला आहे. हे क्षेत्र भारतातील सर्वात व्यस्त हवाई मार्गात येते. त्यामुळे या नोटामला इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध सुरू होण्याचे संकेत मानले जात आहेत.
नवी दिल्लीनंतर मुंबईत असे घडणे याचा अर्थ भारत आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजे विद्युत चुंबकीय युद्धाच्या जगात एन्ट्री घेत आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने आपली सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याचं काम हाती घेतले आहे. दरम्यान, सध्या हवाई युद्ध वेगाने बदलत आहे. आता इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर, जामिंग, स्पूफिंगमध्ये जास्त मेहनत घेतली जात आहे. जीपीएस नोटाम जारी करण्याचा अर्थ नक्कीच काही ना काही आहे, जे कदाचित अदृश्य आहे असे सुरक्षा तज्ज्ञांचे मत आहे.
भारत, पाकिस्तान आणि चीन हे लष्करी आणि नौदल सरावासाठी ‘नोटाम’ जारी करत होते. जीपीएस अस्थिरतेचा हा प्रकार दक्षिण आशियाई सुरक्षेसाठी एक महत्त्वाचा धोका निर्माण करतो. याचा अर्थ आता युद्ध क्षेपणास्त्रांनी नाही तर सिग्नल फ्रिक्वेन्सीने लढले जाऊ शक्यता दर्शवते.
युरोप, मध्य पूर्व आणि दक्षिण पूर्व आशियात अरबी समुद्राच्या या विस्तीर्ण आणि व्यस्त हवाई क्षेत्रातून दररोज शेकडो आंतरराष्ट्रीय उड्डाणे जातात. अशा संवेदनशील कॉरिडॉरवरील जीपीएस हस्तक्षेप ही केवळ विमान वाहतूक यंत्रणेसाठी समस्याच नाही तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्धाच्या सुरुवातीच्या टप्प्यांमधील अदृश्य खेळाचा भाग ठरू शकते.

