सिडनी : वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरात झालेल्या गोळीबारात आतापर्यंत १६ लोकांचा मृत्यू झाला, तर ४२ लोक गंभीर जखमी झाले आहेत. हा हल्ला यहूदींचा उत्सव ‘हनुक्का’च्या आयोजनादरम्यान करण्यात आला. वडील आणि मुलाने मिळून हा हल्ला केला. साजिद अकरम आणि नवीद अकरम अशी दहशतवाद्यांची नावे आहेत. न्यू साउथ वेल्स पोलिसांनी या हल्ल्याला ऑस्ट्रेलियाच्या इतिहासातील सर्वात मोठा यहूदी विरोधी हल्ला म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियातील एका इस्लामिक सेंटरच्या सोशल मीडिया पोस्टमधून अशी माहिती मिळाली आहे की, नवीदने २०२२ मध्ये धार्मिक शिक्षण पूर्ण केले होते. अल-मुराद इस्लामिक इन्स्टिट्यूटचे प्रमुख अॅडम इस्माईल यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार दिला. हल्ल्यानंतर पोलीस आरोपींच्या घरी तपास करण्यासाठी पोहोचले होते, परंतु त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी पोलिसांना घेराव घातला आणि तपास थांबवण्याचा प्रयत्नही केला.
मोदींच्या संवेदना : ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्याबद्दल भारतीय जनतेच्या वतीने मी मन:पूर्वक संवेदना व्यक्त करतो. दु:खाच्या या प्रसंगी आम्ही ऑस्ट्रेलियाच्या जनतेसोबत खंबीरपणे उभे आहोत. भारताचे दहशतवादाबद्दल शून्य सहनशीलतेचे धोरण आहे आणि आम्ही दहशतवादाच्या सर्व प्रकारांविरुद्धच्या लढ्याला पाठिंबा देतो, असे रोखठोक मत मोदी यांनी व्यक्त केले.

