मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील गॅस पुरवठा खंडित
मुंबई : प्रतिनिधी
सीएनजी पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात सीएनजी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. गेलच्या मुख्य गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे सीएनजीवर धावणा-या रिक्षा, टॅक्सी, बस आणि खासगी वाहनांच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, घरगुती पीएनजी ग्राहकांना कोणत्याही व्यत्ययाशिवाय गॅस पुरवठा सुरू राहणार असल्याचे महानगर गॅस लिमिटेड कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र, याचा घरगुती गॅस पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे.
मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात महानगर गॅस लिमिटेडकडून गॅसचा पुरवठा केला जातो. मात्र, आरसीएफ कंपाऊंडमधील गेलच्या मुख्य गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झाला आहे. यामुळे वडाळा येथील एमजीएलच्या सिटी गेट स्टेशनला होणारा सीएनजी गॅस पुरवठा प्रभावित झाला आहे. याचा फटका मुंबईत गॅस पुरवठ्यावर झाला. अर्थात, सर्वांत तीव्र परिणाम मुंबई, नवी मुंबई, ठाण्यातील सीएनजी गॅसवर चालणा-या वाहनांवर झाला. दरम्यान, पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू असून सीएनजी सेवा लवकरच पूर्ववत करण्यात येईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.
सीएनजीवर धावणा-या
वाहनांसमोर नवे संकट
मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतील सीएनजी पुरवठ्यावर परिणाम झाल्याने सीएनजीवर धावणा-या रिक्षा, टॅक्सी, बस आणि खाजगी वाहनांना या टंचाईचा सामना करावा लागणार आहे. हा पुरवठा कधीपर्यंत पूर्ववत होणार याची निश्चित माहिती नाही. त्यामुळे सोमवार या परिस्थितीचा वाहतुकीवर, प्रवाशांवर आणि सार्वजनिक वाहनसेवेवर नेमका किती परिणाम होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

