25.3 C
Latur
Saturday, November 8, 2025
Homeमहाराष्ट्रसीताफळांनी बहरला बाजार; मेळघाटात पर्यटकांची गर्दी

सीताफळांनी बहरला बाजार; मेळघाटात पर्यटकांची गर्दी

अमरावती : प्रतिनिधी
मेळघाटात येणा-या पर्यटकांसाठी सर्वच नवलाईचे आहे. सध्या वातावरणात थंडी हळूहळू वाढू लागली असून, सीताफळांचा गोडवाही वाढू लागला आहे. विदर्भाचे नंदनवन असणा-या चिखलदरा या पर्यटन नगरीच्या बाजारात छान अशी सीताफळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सीताफळं जंगलातून तोडणे, बाजारात त्याची विक्री करणे हे काम सध्या आदिवासी महिला करत आहेत. जंगलातील या सीताफळांची चव मेळघाटात येणारे पर्यटक आनंदाने चाखत असून सीताफळ विक्रीच्या माध्यमातून आदिवासी महिलांच्या हाती पैसा खेळत आहे.

चिखलदरा येथे भर रस्त्यावर केवळ सीताफळांचा बाजार बहरलेला दिसतो. रस्त्याच्या एका बाजूला अनेक महिला सीताफळे विक्रीसाठी घेऊन बसलेल्या दिसतात. चिखलदरासह लगतच्या आलडोह, आमझरी, आडनदी, भिलखेडा या गावातून देखील अनेक महिला या सीताफळे विक्रीसाठी चिखलदराच्या बाजारात येतात. सीताफळांसोबत भुईमुगाच्या शेंगांची देखील विक्री केली जाते. सध्या छत्तीसगड, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश या भागातून येणा-या पर्यटकांची संख्या अधिक असून मेळघाटातील सीताफळे चाखण्याची मजा पर्यटक घेत आहेत.

मेळघाटात चिखलदरा हे मुख्य पर्यटनस्थळ असून याठिकाणी सीताफळांची विक्री मोठ्या प्रमाणात होते. धारणी शहरातील बाजारात देखील सीताफळांची मोठी उलाढाल होते. यासह हरिसाल, समोडोह याठिकाणी देखील सीताफळांची विक्री करण्यासाठी आदिवासी महिला रस्त्याच्या कडेला बसतात. मेळघाटाप्रमाणेच मेळघाटच्या पायथ्याशी असणा-या अचलपूर, चंदूर बाजार आणि अंजनगाव सुर्जी तालुक्यात सीताफळांचे उत्पन्न घेतले जाते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR