सीतामढी : माता जानकीचे जन्मस्थान असलेला बिहारमधील सीतामढी मतदारसंघ हा महत्त्वाचा मतदारसंघ आहे. पूर्वी समाजवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात आजपर्यंत भाजपचा एकही उमेदवार विजयी झालेला नाही. भाजप आणि जनता दल (यू) यांच्यात झालेल्या युतीदरम्यान ही जागा जेडीयूच्या खात्यात गेली. मात्र, २०१९ मध्ये जेडीयूच्या तिकिटावर येथून विजयी झालेले सुनील कुमार पिंटू यावेळी पक्षाचे उमेदवार नाहीत. त्यांच्या जागी पक्षाने विधान परिषदेचे सभापती देवेशचंद्र ठाकूर यांना सातामढीमधून उमेदवारी दिली आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) नेत्यांना आशा आहे की अयोध्येत राम मंदिर बांधण्याचा फायदा या मतदारसंघात होईल. जानकी धामप्रमाणेच हा स्थानिक लोकांसाठी भावनिक प्रश्न आहे. सीतामढीचा नुकताच रामायण सर्किटमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना विकास आणि रोजगाराची अपेक्षा निर्माण झाली आहे. महाआघाडीच्या वतीने आरजेडी नेते अर्जुन राय यांना उमेदवारी देण्यात आली आहे. २०१९ च्या निवडणुकीत राय यांना सुनील कुमार पिंटू यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते.
जेबी कृपलानी सीतामढीचे पहिले खासदार होते
१९५७ मध्ये प्रजा सोशालिस्ट पार्टीचे नेते आणि ज्येष्ठ समाजवादी जेबी कृपलानी यांनी या मतदारसंघातून विजय मिळवण्याचा आणि खासदार होण्याचा मान पटकावला होता. पूर्वी हा मतदारसंघ मुझफ्फरपूर पूर्व म्हणून ओळखला जात होता. काँग्रेस नेते नागेंद्र प्रसाद यांनी १९६२, १९६७, १९७१ मध्ये सलग तीन वेळा येथून विजय मिळवला होता. यानंतर कोणत्याही नेत्याला या मतदारसंघातून सलग तीनवेळा विजय मिळाला नाही. यानंतर काँग्रेसने येथे १९८० आणि १९८४ मध्ये विजय मिळवला होता. त्यानंतर इथून काँग्रेसला विजय मिळाला नाही. २००९ मध्ये जेडीयूचे अर्जुन राय, २०१४ राम किशोर आणि २०१९ मध्ये सुनील कुमार पिंटू यांनी येथून विजय मिळवला होता.