नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय-एम) सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे निधन झाले. सीताराम येचुरी यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. येचुरी यांना फुफ्फुसात संसर्ग झाल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक दिवस डॉक्टरांचे पथक त्याच्यावर उपचार करत होते.
सीताराम येचुरी यांचा जन्म १९५२ मध्ये चेन्नई येथे तेलुगू ब्राह्मण कुटुंबात झाला होता. त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्रात बीए आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून एमएची डिग्री मिळवली. सीताराम येचुरी १९७५ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य झाले. १९७५ मध्ये येचुरी जेएनयूमध्ये शिकत असताना आणीबाणीच्या काळात त्यांना अटक करण्यात आली होती. कॉलेजमधूनच ते राजकारणात आले. जेएनयू विद्यार्थी संघटनेचे ते तीन वेळा अध्यक्ष म्हणून निवडून आले. सीताराम येचुरी यांना २०१५ मध्ये प्रकाश करात यांच्यानंतर सीपीएमचे सरचिटणीस बनवण्यात आले. पक्षाचे ज्येष्ठ नेते दिवंगत हरकिशन सिंग सुरजीत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणाची सुरुवात केली होती.
सीताराम येचुरी यांनी ५० वर्षांपूर्वी विद्यार्थी नेता म्हणून सीपीएममध्ये प्रवेश केला आणि ते सलग तीन वेळा पक्षाचे सरचिटणीस झाले होते. महत्त्वाची बाब म्हणजे २०२१ मध्ये येचुरी यांचा मुलगा आशिष युचेरी यांचे वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी कोविडमुळे मृत्यू झाला होता.
शोक संवेदना
महेबुबा मुफ्ती : येचुरी यांच्या निधनावर पीडीपी नेत्या महेबुबा मुफ्ती यांनी शोक व्यक्त केला आहे. येचुरी यांच्या निधनाची बातमी ऐकून मला धक्का बसला आहे. मी त्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करते, असे मुफ्ती यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी : सीताराम येचुरी यांच्या निधनावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही शोक व्यक्त केला. सीताराम येचुरी हे माझे मित्र होते. ते देशाच्या विचारांचे रक्षक आणि देशाची सखोल जाण असलेली व्यक्ती होते. आमच्यात दीर्घकाळ चर्चा व्हायची. या दु:खाच्या प्रसंगी त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि समर्थकांप्रती माझ्या संवेदना आहेत, असे राहुल गांधींनी शोक संवेदना व्यक्त करताना म्हटलं आहे.