21.7 C
Latur
Wednesday, February 11, 2026
Homeलातूरसीमा सुरक्षा दलातील ३३४ हवालदारांचा शपथविधी

सीमा सुरक्षा दलातील ३३४ हवालदारांचा शपथविधी

चाकूर : प्रतिनिधी
सीमा सुरक्षा दल, चाकूर (महाराष्ट्र)च्या सहाय्यक प्रशिक्षण केंद्राच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज परेड ग्राउंडवर सीमा सुरक्षा दलातील ३३४ नवीन हवालदारांचा शपथविधी समारंभ परेड उत्साहात पार पडली. या शपथ परेडची सलामी विनीत कुमार, महानिरीक्षक, सहायक प्रशिक्षण केंद्र, सीमा सुरक्षा दल, चाकूर यांनी घेतली. या नेत्रदीपक परेडचे नेतृत्व प्रशिक्षीत हवालदार अंबर पांडे यांनी केले. या हवालदारांचे प्रशिक्षण दिं ३ मार्च २५ ते दिं १७ जानेवारी २०२६ पर्यंत ४४ आठवड्यांचे होते.
त्यांचे मूलभूत प्रशिक्षण विनीत कुमार, महानिरीक्षक, सहायक प्रशिक्षण केंद्र, सीमा सुरक्षा दल, चाकूर आणि कमाडंट मदनपाल सिंह यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले. यामध्ये पश्चिम बंगालचे ४७, ओरिसाचे ४४, बिहारचे ४२, आसामचे ३३, गुजरातचे ३२, राजस्थानचे २३, केरळचे २२, पंजाबचे १९, उत्तर प्रदेशचे १७, जम्मू-काश्मीरमधील १४, मध्य प्रदेशचे १२, झारखंडचे १०, मेघालयचे ७, गोव्याचे ६, त्रिपुराचे ४, हिमाचल प्रदेशचे १, दमन दिवचे १ या राज्यांतील एकूण ३३४ प्रशिक्षीत हवालदारांचा समावेश आहे. या समारंभात, त्यांच्या प्रशिक्षण कालावधीत उत्कृष्ट कामगिरी करणा-या प्रशिक्षीत हवालदारांना महानिरीक्षक विनीत कुमार यांच्या हस्ते मेडल आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यांत आले. या सखोल प्रशिक्षणादरम्यान या सैनिकांना शारीरिक क्षमता, शस्त्रे, दारुगोळा, फील्ड क्राफ्ट, नकाशा वाचन आणि फील्ड इंजिनीअरिंगचे प्रशिक्षण देण्यात आले.
याशिवाय अंतर्गत सुरक्षा कर्तव्य, सीमा व्यवस्थापन, कायदा आणि मानवाधिकार आदी विषयांवरही प्रशिक्षण देण्यात आले. महानिरीक्षक विनीत कुमार प्रशिक्षीत नवीन हवालदारांना संबोधित करताना ते म्हणाले की, प्रशिक्षणानंतर त्यांना भारत-पाक आणि भारत-बांगलादेश यांच्यातील विशाल सीमेच्या सुरक्षेसाठी तैनात केले जाईल. हे सैनिक भारताच्या सीमेवरील कठीण प्रसंगांना तोंड देण्यास सक्षम आहेत. सीमा सुरक्षा दलात पाठवून आपल्या शूर पुत्रांना देशसेवेसाठी समर्पित करणा-या त्यांच्या पालकांनाही नमन करण्यात आले. यावेळी त्यांनी परेड मैदानावर उपस्थित अभ्यागत, विशेष पाहूणे, मान्यवर, शाळकरी मुले आणि प्रसारमाध्यमांचे आभार व्यक्त केले. दीक्षांत समारंभानंतर, मलखांब कला आणि शारीरिक कार्यक्षमतेचे प्रदर्शन तसेच देशभक्तीपर गीते प्रशिक्षीत हवालदारांनी सादर केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR