वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेने सीरियामध्ये मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले केले असून, या कारवाईत इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आहे. व्हेनेजुएलामधील कारवाईनंतर यंदाच्या वर्षातील अमेरिकन लष्कराची ही दुसरी मोठी लष्करी कारवाई आहे. डिसेंबर महिन्यात अमेरिकन सैनिकांवर झालेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात हे हल्ले करण्यात आले आहेत.
अमेरिका आणि तिच्या सहयोगी सैन्यदलांनी सीरियामध्ये मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले केले. व्हेनेजुएलानंतर यंदा ही अमेरिकेची दुसरी मोठी लष्करी कारवाई ठरते. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने याबाबत माहिती देताना सांगितले की, या हल्ल्यांमध्ये दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आहे.
अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी लष्करी कारवाईबाबत लिहिताना म्हटले, ‘आम्ही कधीही विसरणार नाही आणि कधीही माघार घेणार नाही.’ डिसेंबर महिन्यात ट्रम्प प्रशासनाने ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’ची घोषणा केली होती. त्यावेळी सीरियातील पालमायरा येथे इस्लामिक स्टेटच्या एका बंदूकधा-याने दबा धरून हल्ला करत दोन अमेरिकन सैनिक आणि एका अमेरिकन नागरिक दुभाषिया कॉन्ट्रॅक्टरची हत्या केली होती.
बीबीसीने, एका अधिका-याच्या हवाल्याने सांगितले की, अमेरिका आणि तिच्या सहयोगी सैन्यदलांनी या ऑपरेशनमध्ये ३५ पेक्षा अधिक ठिकाणांवर ९० हून अधिक शस्त्रास्त्रांचा वापर केला. या कारवाईत २० पेक्षा जास्त विमानांनी सहभाग घेतला. जॉर्डनचे एफ-१६ हे विमान देखील सहभागी होते. हल्ले नेमके कुठे झाले आणि त्यात किती दहशतवादी मारले गेले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती देण्यात आली नाही.

