लातूर : प्रतिनिधी
शासन स्तरावरून एखादे अभियान सुरू केले जाते. ग्रामपंचायती शासनाचे अभियान जिव लावून पूर्ण करते. स्पर्धेत ज्या गावांनी चांगले काम केले. त्या गावांची पुरस्कारासाठी निवड होते. अगदी याच पध्दतीने ग्रामपंचायतींनी आपल्या सर्वच कार्यक्षेत्रात प्रभावीपणे काम केल्याने अशा १० गावांची आर. आर. (आबा) पाटील तालुका सुंदर गाव पुरस्कारासाठी गेल्यावर्षी ऑगस्ट मध्ये निवड झाली होती. या ग्रामपंचायतीच्या पुरस्काराचे १ कोटी रूपये नुकतेच लातूर जिल्हा परिषदेकडे आले आहेत. ते लवकरच ग्रामपंचायतींच्या खात्यावर वर्ग होणार आहेत.
आर. आर. (आबा) पाटील तालुका सुंदर गाव २०२२-२३ पुरस्कारासाठी तालुका स्तरीय समित्या नेमण्यात आल्या होत्या. सदर समित्यांनी दुस-या तालुक्यात जाऊन ग्रामपंचायतींचे राबवलेल्या उपक्रमानुसार गुणांकणाची तपासणी केली होती. त्यानुसार तालुकास्तरीय सुंदर गाव पुरस्कारात लातूर तालुक्यातील सिकंदरपूर, अहमदपूर तालुक्यातील सताळा, जळकोट तालुक्यातील शेलदारा, उदगीर तालुक्यातील बामणी, देवणी तालुक्यातील आंबेगाव, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील गणेशवाडी, निलंगा तालुक्यातील काटेजवळगा, औसा तालुक्यातील तांबारवाडी, रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव, चाकूर तालुक्यातील तिवघाळ या गावांची ऑगस्ट आखेर गेल्यावर्षी निवड झाली होती. या गावांना प्रत्येकी १० लाखाचे बक्षीस (१ कोटी रूपये) व पुरस्कार जाहिर झाले होते. त्यानुसार तब्बल १३ महिण्याच्या नंतर तालुका स्तरीय पुरस्काराची रक्कम लातूर जिल्हा परिषदेच्याकडे नुकतीच प्राप्त झाली आहे. लवकरच सदर रक्कम ग्रामपंचायतींच्या खात्यावर वर्ग होणार आहे.
















