22.6 C
Latur
Sunday, December 14, 2025
Homeमहाराष्ट्रसुटकेसमधील तरुणीच्या मृतदेहाचे उकलले गूढ

सुटकेसमधील तरुणीच्या मृतदेहाचे उकलले गूढ

ठाणे : प्रतिनिधी
कल्याण-शीळ महामार्गावरील देसाई खाडीच्या उड्डाणपुलाखाली सुटकेसमध्ये एका २२ वर्षीय महिलेचा मृतदेह फेकून देण्यात आला होता. त्या महिलेच्या मारेक-याचा पोलिसांनी सोशल मीडिया आणि सीसीटीव्हीच्या साह्याने २४ तासांत छडा लागून विनोद श्रीनिवास विश्वकर्मा (५०) या आरोपीला बेड्या ठोकल्या.

भीक मागणा-या मृत तरुणीला पाच वर्षांपूर्वी आरोपीने मुंब्रा स्थानकातून आपल्या घरी आणले होते. तेव्हापासून ते दोघे जण एकाच घरात रहात होते. मात्र किरकोळ कारणावरून सुरू झालेले भांडण विकोपाला गेले आणि रागाच्या भरात गळा दाबून तिची हत्या केली, अशी कबुली आरोपीने पोलिसांना दिली. डायघर पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी चार पथके नियुक्त केली होती.

मृत प्रियंका विश्वकर्मा ही ठाण्यातील देसाई गावात गेल्या पाच वर्षांपासून आरोपी विनोद विश्वकर्मा याच्या घरी राहत होती. मूळची उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील प्रियंका ही १७ वर्षाची असताना ठाण्यात आली. ती विनोदसोबत सुखाने राहत होती. त्यांच्यात अधूनमधून किरकोळ भांडण होत असे. मात्र २१ नोव्हेंबरला दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. हे भांडण इतके विकोपाला गेले की आरोपी विनोद याने तिचा गळा दाबला. ती मेल्याचे लक्षात येताच त्याने तिचा मृतदेह एका सुटकेसमध्ये ठेवला. एक दिवस ती सुटकेस तशीच घरी ठेवली.

मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागल्याने आरोपीने २२ नोव्हेंबरला रात्री साडेअकरा ते बाराच्या सुमारास ती मृतदेह असलेली ट्रॉली बॅग तशीच रस्त्याने चालत नेऊन देसाई खाडी पुलावरून खाली फेकून दिली होती. पुलावरून सुटकेस खाली पडल्याने त्यातील मृतदेहाचे काही भाग बाहेर पडले. घटनास्थळी शीळ-डायघर पोलिस ठाण्यातील पोलिस पोहोचले आणि तपास सुरू झाला. पोलिसांनी सोशल मीडियावर बातमी प्रसारित केली आणि एका व्यक्तीने संबंधित महिलेची माहिती अपर पोलिस आयुक्त विनायक देशमुख यांना दिली. त्यानंतर सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला शोधून काढले आणि २४ तासांत त्याला बेड्या ठोकल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR