Homeमहाराष्ट्रसुनेत्रा पवारच राष्ट्रीय पक्षाध्यक्ष

सुनेत्रा पवारच राष्ट्रीय पक्षाध्यक्ष

राष्ट्रावादीच्या नव्या ठरावांना निवडणूक आयोगाची मान्यता
पटेल, तटकरे
यांना मोठा धक्का
मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत रचनेत गेल्या २ महिन्यांत मोठे फेरबदल झाले असून, आता पक्षाची धुरा अधिकृतपणे सुनेत्रा पवार यांच्या हाती आली आहे. १६ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२६ दरम्यान घडलेल्या वेगवान घडामोडींनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाच्या नव्या ठरावांना आणि कार्यकारिणीला मान्यता दिली. यामुळे सुनेत्रा पवार यांची अध्यक्ष म्हणून आणि पार्थ पवार यांची खासदारकी कायदेशीररित्या भक्कम झाली आहे.

पक्षातील बदलांची सुरुवात १६ फेब्रुवारी २०२६ रोजी झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दिवशी निवडणूक आयोगाला एक नवी पक्षाघटना सादर करण्यात आली होती. यामध्ये कार्याध्यक्ष (प्रफुल्ल पटेल) यांना राष्ट्रीय अध्यक्षांच्या समकक्ष अधिकार देण्याची तरतूद करण्यात आली होती. मात्र, निवडणूक आयोगाने ही नवी घटना स्वीकारली नाही किंवा तिला मान्यताही दिली नाही. त्यानंतर २६ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईतील वरळी येथे पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात अत्यंत महत्त्वाचे २ निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच पक्षाच्या मूळ घटनेत बदल करून कार्यकारिणीची मुदत ३ वर्षांवरून ५ वर्षांपर्यंत वाढवण्यात आली.

प्रफुल्ल पटेल यांचे पत्र अमान्य
१ मार्च २०२६ रोजी प्रफुल्ल पटेल यांचे विश्वासू ब्रिजमोहन यांनी ई-मेलद्वारे आयोगाला माहिती देण्याचा प्रयत्न केला. यात सुनेत्रा पवार अध्यक्ष आणि प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष असल्याचा उल्लेख होता. मात्र, या पत्रासोबत अधिवेशनातील अधिकृत ठराव किंवा आमदार-खासदारांच्या सह्या नसल्याने आयोगाने त्याकडे दुर्लक्ष केले.

१० मार्चच्या अधिवेशन
ठरावाची घेतली दखल
२६ फेब्रुवारी रोजी झालेल्या राष्ट्रवादीच्या वरळी अधिवेशनातील अधिकृत ठराव १० मार्च २०२६ रोजी आयोगाकडे पाठवण्यात आला. या ठरावात सुनेत्रा पवार-राष्ट्रीय अध्यक्ष आणि शिवाजीराव गर्जे-खजिनदार असा उल्लेख असून, कार्यकारिणीत पटेल, तटकरे, भुजबळ यांच्यासह १४ जणांचा समावेश करण्यात आला. परंतु यात त्यांच्या पदांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. आयोगाच्या अभिलेखावर अधिकृत प्रतिनिधी म्हणून शिवाजीराव गर्जे यांच्या नावाचा उल्लेख असल्याने आयोगाने त्यांच्याशी संपर्क करून अधिकृत पत्रव्यवहार पूर्ण केला.

अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब
निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसने पाठवलेल्या ठरावांची सखोल छाननी करून त्यांना मान्यता दिली. त्यामुळे सुनेत्रा पवार यांची अध्यक्षपदी निवड आणि पार्थ पवार यांची खासदारकी यात कोणतीही कायदेशीर कमतरता नाही. या निर्णयांना आता सहजासहजी आव्हान देता येणार नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR