31.1 C
Latur
Saturday, February 14, 2026
Homeमहाराष्ट्रसुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री शपथविधीवरुन नाराजीनाट्य

सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री शपथविधीवरुन नाराजीनाट्य

पार्थ पवार यांनी घेतली शरद पवार यांची भेट

मुंबई : राष्ट्रवादीमध्ये घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थीचं विसर्जन केल्यानंतर सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार हे बारामतीतून मुंबईला रवाना झाले होते. मुंबईत शनिवारी दुपारी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला हजर राहण्यासाठी सुनेत्रा पवार या रस्ते मार्गाने मुंबईला रवाना झाल्या होत्या. शनिवारी पहाटे हे सर्व मुंबईत दाखल झाले आहेत.

सुनेत्रा पवार मुंबईत दाखल झाल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं यासाठी त्यांचा पक्ष आग्रही आहे. सुनेत्रा पवार यांच्यासोबत जय पवार आणि नरेश अरोरा हे देखील मुंबईत दाखल झाले आहेत. शनिवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या आमदारांची बैठक होणार आहे. शनिवारी सायंकाळी सुनेत्रा पवार यांचा राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी होण्याची शक्यता आहे.

पार्थ पवार यांनी घेतली शरद पवार यांची भेट दरम्यान, उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा पवार घेत आहेत याबाबतची मला कल्पना नसल्याची माहिती शरद पवार यांनी दिली होती. त्यानंतर पवार कुटुंबात नाराजी असल्याचं समोर आलं होतं. शरद पवार यांच्या विधानानंतर पार्थ पवार हे बारामतीमधील शरद पवार यांच्या ‘गोविंदबाग’ या निवासस्थानी दाखल झाले होते. पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

पार्थ पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता

शपथविधीपूर्वी दुपारी विधानभवनात राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत सुनेत्रा पवारांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली जाईल. या बैठकीबाबत सुनील तटकरे यांनी विधिमंडळात पक्षाचं अधिकृत पत्रही दिलं आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल. यामुळे रिक्त होणा-या जागी पार्थ पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबतचा कोणताही निर्णय हा राष्ट्रवादी पक्षच घेईल. राष्ट्रवादी पक्षाच्या त्या निर्णयांना आमचा पाठिंबा असेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माझ्यासोबत दोनवेळा चर्चा केली आहे. पण, कोणत्याही मुद्द्यावरचा अंतिम निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR