27.2 C
Latur
Saturday, March 7, 2026
Homeमहाराष्ट्रसुनेत्रा पवारांनी बारामती जिल्हा परिषदेसाठी केले मतदान

सुनेत्रा पवारांनी बारामती जिल्हा परिषदेसाठी केले मतदान

अजितदादांची परंपरा जपली

बारामती : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. अजित पवार यांच्या अपघाती निधनाने रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी लोकभवनवर साध्या पद्धतीने झाला. यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांनी अजितदादांची परंपरा कायम राखली. सकाळी लवकर मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

संपूर्ण राज्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे या निवडणुकीचे मतदान पुढे ढकलण्यात आले होते. बारामती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. याच जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी अजित पवार मुंबईहून बारामतीला विमानाने येत होते. बारामती विमानतळावर विमान उतरत असताना झालेल्या भीषण अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. या दु:खातून बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रातील जनता अद्यापही सावरलेली दिसत नाही. यातच अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरी जात आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांची एक परंपरा जपली आहे. मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सकाळी लवकरच सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे मतदानासाठी पोहोचले. या दोघांनी काटेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदानाचा हक्क बजावला. अजित पवार हे कायमच सकाळी लवकर कामाला सुरुवात करायचे. अजितदादा मतदानालाही सकाळीच मतदान केंद्रावर पोहोचायचे. सुनेत्रा पवार यांनी अजितदादांची हीच परंपरा कायम ठेवल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, युगेंद्र पवार, शर्मिला पवार आणि राजेंद्र पवार यांनी बारामतीच्या कन्हेरी जिल्हा परिषद शाळेत मतदान केले. यंदाची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरणार आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार पूर्णपणे थंडावला होता. केवळ वैयक्तिक भेटीगाठींवर भर देण्यात आला होता. त्यामुळे आता मतदार कोणाच्या पारड्यात दान टाकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR