मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या पत्नी व खासदार सुनेत्रा पवार शुक्रवारी रात्री उशिरा मुंबईत पोहोचल्या आहेत. त्यामुळे शनिवारी दिवसभरात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. राज्यातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार या सायंकाळी पाच वाजता शपथ घेणार आहेत. त्यामुळे तत्पूर्वी सुनेत्रा पवार यांनी खासदारकीचा राजीनामा दिला असल्याचे समजते.
शनिवारी सकाळपासूनच मुंबईत वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीस माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या ज्येष्ठ नेत्यांमध्ये उपमुख्यमंत्रिपद, राष्ट्रीय अध्यक्ष व पक्षाच्या वाट्याला येणार असलेल्या खात्यांबाबत चर्चा झाली असल्याचे समजते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची दुपारी दोन वाजता बैठक होणार असून या बैठकीत विधिमंडळाचा नेता निवडला जाणार आहे. या निवडीनंतर त्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांना दिली जाणार आहे. त्यानंतर आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्याची तयारी पूर्ण झाली असून एका साध्या समारंभात त्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
खासदार सुनेत्रा पवार यांनी त्यांचा खासदारकीचा राजीनामा शनिवारी राज्यसभेचे सभापती व उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे पाठवून दिला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. सुनेत्रा पवार यांनी गटनेता निवड अन् शपथेपूर्वीच खासदारकी सोडली आहे. त्यामुळे सर्वांचे याकडे लक्ष लागून राहिले आहे.
या सर्व प्रक्रियेपूर्वीच सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा (खासदारकीचा) राजीनामा दिला असल्याचे समजते. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार शपथ घेणार आहेत. त्यामुळे सर्वांचे याकडे लक्ष लागून राहिले आहे.

