27.2 C
Latur
Saturday, March 7, 2026
Homeमहाराष्ट्रसुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरून वाद

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरून वाद

कदम, सामंत, शिरसाट यांच्या टीकेवर फडणवीसांचे प्रत्युत्तर

मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २८ जानेवारी रोजी झालेल्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी लोकभवनवर साध्या पद्धतीने झाला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. घाई-घाईने झालेल्या या शपथविधीवरून वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्यात वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत.

दादांची स्मशानातील राख विझली नव्हती तोच शरद पवार यांना शह देण्यासाठी सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार वहिनींना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला भाग पाडले, व सध्या सुनील तटकरे अतिशय गलिच्छ राजकारण करत आहेत अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली. रामदास कदम यांनी केलेल्या टीकेबाबत पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला.

याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, सध्या सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत जो काही वाद होत आहे, तो अतिशय निरर्थक अशा प्रकारचा आहे. अतिशय चुकीच्या प्रकारचा हा वाद-विवाद होत आहे. प्रत्येक व्यक्ती स्वत:चे राजकारण यात कसे करता येईल, हाच प्रयत्न करत आहे. पण हे अतिशय चुकीचे आहे. राज्यातील मोठे नेते अजित पवार हे आपल्यातून निघून गेले आहेत आणि त्यानंतर प्रत्येक व्यक्ती राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे, हे चुकीचे आहे. अशा प्रकारचे खालच्या पातळीचे राजकारण बंद झाले पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, प्रसंग कठीण होता. पण, ज्या धीरोदात्तपणे सुनेत्रा वहिनींनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला, तो कौतुकास्पद, धाडसी आणि त्यांची प्रतिबद्धता अधोरेखित करणारा आहे. शुभेच्छा देण्याचा हा प्रसंग नाही. पण, अजितदादांचा वारसा त्या समर्थपणे चालवतील, हा मला विश्वास आहे. राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्या, त्यांची ही कारकीर्द यशस्वी ठरेल. भाजपा आणि महायुती सरकार म्हणून या कठीण प्रसंगी, आम्ही अजितदादा पवार यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.

शपथविधी लवकर कुणी करायला लावला? -उदय सामंत
मंत्री उदय सामंत याविषयी बोलताना म्हणाले की, सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्यामुळे कुणाला वाईट वाटेल असे अजिबात नाही. पण हे इतक्या लवकर का झाले? कुणी करायला लावले? मग हे कुणी घडवून आणले आहे का? अशा पद्धतीच्या शंका आम्ही काढत नाही. पण सोशल मीडियावर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील शंका दिसून येतात. त्याच्यात कुणी काय म्हणाले? यावर बोलण्याचा मला अधिकार नाही, असे उदय सामंत म्हणाले.

घाईगडबडीत उरकलेला शपथविधी लोकांना आवडला नाही : संजय शिरसाट
दुसरीकडे, मंत्री संजय शिरसाट यांनीही सुनेत्रा पवारांचा घाईगडबडीत उरकलेला शपथविधी लोकांना आवडला नसल्याचा दावा केला आहे. अजित पवारांच्या दु:खद घटनेनंतर लवकर शपथविधी होणे हे सर्वसामान्य माणसांना आवडले नाही. म्हणून मी त्यावेळी माझी भावना व्यक्त केली. ही लोकभावना आहे. मी ती मांडली. या प्रकरणी कुणाचा गैरसमज होत असेल तर त्याविषयी मला काही देणेघेणे नाही.

राख विझली नसताना शपथविधी : रामदास कदम
अजितदादा गेल्यावर शरद पवारांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गलिच्छ राजकारण सुरू केले. दादांची स्मशानातील राख विझली नव्हती तोच सुनेत्रा पवार यांना शपथ घ्यायला लावली असे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी म्हणत सुनील तटकरे यांच्यावर आरोप केले आहेत. रामदास कदम म्हणाले की, सुनेत्रा पवार यांचा शपथविधी १० दिवसांनंतर घेतला असता तर काय झाले असते? हा माणूस इतका चाणाक्ष आहे, त्यांना वाटले की शरद पवार पक्षाचा ताबा घेतील म्हणून त्यांनी शपथविधी करायला लावला, असा दावा कदम यांनी केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR