मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक शनिवारी दुपारी विधिमंडळाच्या सभागृहात पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळाच्या गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी पहिल्यांदा अजित पवार यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. तर त्यांच्या नावाला छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर विधिमंडळाच्या गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव सर्व उपस्थित आमदारांनी एकमताने मंजूर केला.
यावेळी बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पहिल्यांदा त्यांच्या निवडीचा प्रस्ताव मांडला. या आमदारांच्या बैठकीत एकमताने विधिमंडळाच्या गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर त्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली जाणार आहे. त्यानंतर शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
येथील लोकभवनात शपथविधीचा समारंभ सायंकाळी पाच वाजता आयोजित करÞण्यात आला आहे. यावेळी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असून साध्या पद्धतीने त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांना देखील या निवडीबद्दल अवगत करण्यात येणार आहे. त्या ठिकाणची सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या निवडीबाबतची माहिती देण्यात येणार असल्याचे समजते.
दरम्यान, शनिवारी सकाळीच खासदार सुनेत्रा पवार यांनी त्यांचा खासदारकीचा राजीनामा राज्यसभेचे सभापती व उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे पाठवून दिला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे आता सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे.

