पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा स्पष्ट आणि थेट भूमिका समोर आली असून, सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत ‘विचार केला जाईल’ असे संकेत दिल्यानंतर पक्षातीलच आमदार अमोल मिटकरी यांनी तीव्र आणि ठाम भूमिका मांडली आहे.
मिटकरी यांनी या विषयावर ‘विचार करू’ हा शब्दच येता कामा नये, अशा शब्दांत पक्षामधील नेत्या रुपाली चाकणकर यांना खडे बोल सुनावले आहेत. रुपाली चाकणकर यांनी सुनेत्रा पवार यांचा राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबतचा प्रस्ताव आल्यास त्यावर नक्कीच विचार केला जाईल, असे म्हणताच मिटकरी यांनी संताप व्यक्त केला.
मिटकरी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, सुनेत्रा पवार याच अजित पवार यांच्या ख-या राजकीय उत्तराधिकारी आहेत आणि त्या जागेवर त्यांच्याशिवाय दुसरा कोणताही विचार होऊ शकत नाही. आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याचेही हेच मत आहे. त्यामुळे प्रस्ताव आला तर विचार करू अशी भाषा वापरणे हे पक्षाच्या भावनांना धक्का देणारी आहे, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. ‘सुनेत्रा वहिनी याच राष्ट्रीय अध्यक्ष होतील, त्या अध्यक्ष झाल्या पाहिजेत आणि त्यांच्या नेतृत्वातच आम्ही काम करू’ असे विधान करत मिटकरी यांनी नेतृत्वाबाबत कोणतीही संदिग्धता ठेवली नाही. या मुद्यावर विचार करू अशा पद्धतीने बोलणा-यांना आमचे समर्थन नसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले

