ज्येष्ठ कॉंग्रेस नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन
लातूर : प्रतिनिधी
कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष, पंजाबचे माजी राज्यपाल, भारतीय राजकारणातील सुसंस्कृत, निष्कलंक, अभ्यासू आणि संसदीय परंपरा जपणारे नेते, लातूरचे सुपुत्र शिवराज पाटील चाकूरकर यांचे आज (शुक्रवारी) सकाळी ६.३० वाजता देवघर या त्यांच्या निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. जिल्ह्यातील चाकूर गावातून सुरू झालेला त्यांचा सामाजिक, राजकीय क्षेत्रातील प्रवास राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचला आणि ६ दशकांहून अधिक काळ जनसेवेत राहून त्यांनी भारतीय राजकारणात आपली एक वेगळी छाप सोडली. या महान नेतृत्वाची आज प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी ११ वाजता लातूर शहराजवळील वरवटी येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा शैलेश पाटील चाकूरकर, स्नुषा डॉ. अर्चना पाटील चाकूरकर आणि दोन नाती असा परिवार आहे.
शिवराज पाटील चाकूरकर यांनी तत्कालीन लातूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष ते देशाच्या लोकसभेचे सभापती, केंद्रीय गृहमंत्री, पंजाबचे राज्यपाल यासह राज्य आणि केंद्रीय राजकारणात विविध मंत्रिपदासह विविध पदे भूषविलेली आहेत. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच लातूर शहर, जिल्हा व राज्यातून विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लातूर येथील ‘देवघर’ या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, काशीचे जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर महास्वामीजी, हभप गहिनीनाथ महाराज, माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, माजी खा. रुपाताई पाटील, माजी खा. सुनिल गायकवाड, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अभय साळुंके आदींनी शिवराज पाटील चाकूरकर यांना पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली.
माजी केंद्रीयमंत्री शिवराज पाटील चाकूरकर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. शिवराज पाटील चाकूरकर आयुष्यभर कॉंग्रेस पक्षात सक्रीय राहिले. मागच्या काही वर्षांपासून त्यांनी भारतीय राजकारणातून काही अंशी निवृत्ती घेतली होती. मात्र, सातत्याने राजकीय नेत्यांशी गाठीभेटी, संवाद सुरूच होता.
भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे आणि अनुभवी व्यक्तिमत्त्व म्हणून शिवराज पाटील चाकूरकर यांची ओळख होती. १२ ऑक्टोबर १९३५ रोजी लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे जन्मलेले शिवराज पाटील चाकूरकर यांनी उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान विषयात पदवी प्राप्त केली. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून ते कायद्याचे पदवीधर बनले. १९६० नंतर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच लातूर नगर परिषदेतून सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली. प्रथम लातूर नगर परिषदेचे अध्यक्ष, त्यानंतर दोनवेळा विधानसभा आणि १९८० पासून सलग ७ वेळा लातूरचे प्रतिनिधित्व करत त्यांनी राष्ट्रीय पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली.
सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षातही त्यांनी जाहीरनामा समितीच्या अध्यक्षपदासह अनेक महत्त्वाच्या जबाबदा-या सांभाळल्या. २००४ मध्ये निवडणूक हरूनही त्यांच्यावर विश्वास ठेवत केंद्रातील गृहमंत्रिपद देण्यात आले. मात्र २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेतील त्रुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी ३० नोव्हेंबर २००८ रोजी राजीनामा दिला. २०१० ते २०१५ या काळात ते पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगड केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक म्हणून कार्यरत होते. देशातील उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सुरू करण्याचे श्रेयही त्यांना दिले जाते. शिवराज पाटील हे सत्य साईबाबांचे निष्ठावंत अनुयायी म्हणूनही परिचित होते.
केंद्रीय मंत्रिमंडळात
विविध मंत्रिपदाची धुरा
इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण राज्यमंत्री, वाणिज्य, विज्ञान-तंत्रज्ञान, अणुऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स व अवकाश अशा महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी त्यांनी सांभाळली. १९९१ ते १९९६ या काळात ते देशाचे १० वे लोकसभा अध्यक्ष होते.
लोकसभेच्या आधुनिकीकरणात
चाकूरकर यांचे महत्त्वाचे योगदान
लोकसभेचे आधुनिकीकरण, संगणकीकरण, संसदेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण, नवे ग्रंथालय इमारत यांसारख्या उपक्रमांना त्यांनी गती दिली. देश-विदेशातील अनेक संसदीय परिषदांमध्ये त्यांनी भारताचे नेतृत्व केले. त्यांच्या काळात लोकसभेचे कामकाज अधिक पारदर्शक आणि जनसुलभ करण्यासाठी ते प्रयत्नशील राहिले.
संसदीय कामकाजाचा
सहा दशकांचा अनुभव
सुमारे सहा दशकांचा संसदीय आणि प्रशासकीय अनुभव, विविध मंत्रालयातील कामकाज आणि लोकसभा अध्यक्ष म्हणून केलेले योगदान यामुळे शिवराज पाटील चाकूरकर हे भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे आणि अभ्यासू राजकारणी होते. त्यांच्या निधनाने एक सुसंस्कृत नेतृत्व हरपल्याची प्रतिक्रिया राजकीय गोटातून व्यक्त होत आहे.

