वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
काही महिन्यांपूर्वी भारतीय अंतराळ संशोधन संस्था, म्हणजेच इस्रोने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल-१ यान पाठवले होते. आता याच आदित्य एल-१ आणि पूर्वी पाठवलेल्या चांद्रयान-२ ने सूर्याची काही भयंकर छायाचित्रे घेतली आहेत. इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, या फोटोमध्ये सूर्यावर अतिशय मोठा स्फोट झाल्याचे दिसत आहे. या स्फोटाचा सौर वादळाच्या रुपात पृथ्वीवर परिणाम झाला. २००३ च्या भूचुंबकीय वादळानंतर सूर्यावरील हा स्फोट सर्वात भयंकर होता.
तब्बल २१ वर्षांनंतर आलेल्या या वादळाने शास्त्रज्ञांनाही हैराण केले आहे. इस्रो व्यतिरिक्त, ‘एनओएए’ स्पेस वेदर प्रेडिक्शन सेंटरने देखील याची पुष्टी केली. सूर्यावर आणखी स्फोट होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. अशा प्रकारची सौर वादळे येत राहिल्यास पृथ्वीवरील दळणवळण यंत्रणा आणि जीपीएस यंत्रणेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
सौर वादळ म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागावर होणारे स्फोट. ते ताशी कित्येक लाख किलोमीटर वेगाने वातावरणात पसरतात. अशी सौर वादळे अवकाशातील कण शोषून घेत पुढे सरकतात.