दिलीप डासाळकर
सेलू : तालुक्यातील वाकडी येथे असलेला निम्न दुधना प्रकल्प सेलू तालुक्यासह परभणी, जालना आणि नांदेड जिल्ह्याला वरदान ठरत आहे. या प्रकल्पात शनिवार, दि.२५ एप्रिल रोजी १०३.५७८ दलघमी. जिवंत पाणीसाठा असून मे महिन्याच्या शेवटपर्यंत पुरेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सेलू तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
सेलू तालुक्यात असलेल्या निम्न दुधना प्रकल्पाची पाणी पातळी क्षमता ४२३.६२० एवढी आहे. मागील पावसाळ्यात प्रकल्प जवळपास ८० टक्के भरला होता. तत्पूर्वी निम्न दुधना प्रकल्पातून मागील पावसाळ्यात दोन ते तीन वेळा पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर निम्न दुधना प्रकल्पातून सेलू, परतुर, मंठा या गावांसह ९५ गावांना तसेच १०६ गाव पाणीपुरवठा अशा दोन पाणीपुरवठा योजनांना पिण्याचे पाणी प्रकल्पातून राखीव ठेवण्यात आलेले आहे. परतूर येथील बागेश्वरी साखर कारखान्याकरिता देखील काही पाणीसाठा राखीव ठेवण्यात आलेला आहे. त्यानुसार या सर्व गावांसह बागेश्वरी कारखान्यासहित निम्न दुधना प्रकल्पातून दररोज जवळपास १ दलघमी एवढा पाणी वापर आहे. आजच्या स्थितीत उपलब्ध असलेला पाणीसाठा पाहता मे अखेरपर्यंत पिण्यासाठी पुरेल अशी अपेक्षा आहे.
निम्न दुधना प्रकल्पातील एकूण पाणीसाठ्यापैकी जवळपास १५.७८ दलघमी एवढा पाणीसाठा आरक्षित ठेवण्यात आलेला आहे. या प्रकल्पात एकूण जलसाठा २०६.१७८ दलघमी असून शनिवारी एकूण १०३.५७८ दलघमी अर्थात ४२.७७ एवढा पाणीसाठा असून पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही अशी अपेक्षा आहे. मागील वर्षी आजच्या तारखेस निम्न दुधना प्रकल्पामध्ये ३५.४० टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्या तुलनेत यावर्षीच्या जिवंत पाणी साठ्यात वाढ झालेली आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंतीची वेळ येणार नसल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
या प्रकल्पात असलेल्या पाणीसाठ्याचे दररोज अंदाजे ८.३२ मिलिमीटर एवढे बाष्पीभवन होते. हे बाष्पीभवन गृहीत धरून सध्याचा पाणीसाठा पुरेसा आहे. तरी देखील शासन स्तरावरून पाणी वापर करताना योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. प्रकल्पातील बिगर सिंचन पाणी वापर ०.०३१० दलघमी एवढा आहे. हा प्रकल्प होण्यापूर्वी सेलू तालुक्यातील जनतेला पाण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात धावपळ करावी लागत होती. त्यामुळेच सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्प परभणी जिल्ह्यासह जालना, नांदेड जिल्ह्याकरिता देखील वरदान ठरत आहे.

