मुंबई : प्रतिनिधी
मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैयारा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. १८ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली. पहिल्याच चित्रपटातून अहान आणि अनितच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.ऑनस्क्रीन या दोघांची केमिस्ट्री हिट ठरलीच, पण आता ऑफस्क्रीनसुद्धा दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले असून अहान आणि अनित ख-या आयुष्यात एकमेकांना डेट करत आहेत.
यशराज फिल्म्स निर्मित आणि मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैयारा’ हा चित्रपट २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अ मूमेंट टू रिमेंबर’ या कोरियन चित्रपटावर आधारित आहे. या चित्रपटाने जगभरात तब्बल ५७७ कोटी रुपयांची कमाई केली होती. २०२५ या वर्षातील हा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. त्यानंतर ओटीटीवरही त्याला दमदार प्रतिसाद मिळाला.
सध्या नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट स्ट्रीम होत आहे. अहान आणि अनित यांच्यातील जबरदस्त केमिस्ट्री या चित्रपटाच्या यशामागील कारणांपैकी एक आहे. ऑनस्क्रीन एकत्र काम करताना हे दोघं ऑफस्क्रीनसुद्धा एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. परंतु त्यांनी त्यांचे रिलेशनशिप इतक्यात सार्वजनिक न करण्याचे ठरवले आहे.
त्यामुळे यापुढील करिअरची बाब लक्षात घेता त्यांनी रिलेशनशिप जाहीर न करण्याचे ठरवले आहे. ‘सैयारा’च्या पार्टीदरम्यानही दोघांमधील जवळीक स्पष्ट दिसत होती. त्यानंतर एका मॉलमध्येही अहान आणि अनितला एकत्र शॉपिंग करताना पाहिलं गेलं. मॉलमधील त्यांचा एक व्हीडीओसुद्धा व्हायरल झाला होता. ज्यामध्ये अहान अनितचा हात पकडण्याचा प्रयत्न करतो, परंतु ती कॅमेरे पाहून नाकारते. नंतर दोघांचा एकाच कारने प्रवास करतानाचाही व्हीडीओ समोर आला. विविध व्हीडीओंमध्ये त्यांच्यातील जवळीक स्पष्ट दिसली होती.
















