लातूर : एजाज शेख
यंदा पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील पिकांनंतर आता फळबागाही गंभीर संकटात सापडल्या आहेत. पाण्याचे स्त्रोत आटत चाललल्याने आणि भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावल्याने शेतक-यांसमोर वर्षानुवर्षांच्या मेहनतीने उभ्या केलेल्या फळबागा वाचविण्याचे मोठे आव्हान उभे टाकले आहे. लातूर जिल्ह्याचे एकुण भौागोलिक क्षेत्र ७.१५ लाख हेक्टर आहे. त्यापैकी एकुण लागवडीखालील (शेतीयोग्य) क्षेत्र ६.६५ लाख हेक्टर आहे. एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी फळबाग क्षेत्र ४ हजार ५४० हेक्टरच्यादरम्यान पसरलेले आहे. लातूर जिल्हा मुख्यत्वे सोयाबीन आणि डाळींच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असला, तरी जलसंधारणाच्या कामांमुळे येथील फळबाग क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. परंतु, या वर्षी दुष्काळामुळे जिल्ह्यातील फळबाग क्षेत्र करपून गेले आहे.
लातूर जिल्ह्यात प्रामुख्याने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) आणि एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोकरा) या ३ मुख्य फळबाग योजना राबविल्या जातात. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही पूर्णपणे राज्य शासनाची योजना असून, ज्या शेतक-यांना ‘मनरेगा’अंतर्गत लाभ मिळत नाही, त्यांच्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
लातूर जिल्ह्यासाठी किमान ०.२० हेक्टर ते कमाल ६.०० हेक्टरपर्यंत असून या योजनेत आंबा, पेरू, डाळिंब, मोसंबी, सीताफळ, कागदी लिंबू, चिकू यांसह एकूण १६ बहुवार्षिक फळपिकाचा समावेश आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जॉबकार्डधारक, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी तसेच अनुसूचित जाती/जमातीच्या शेतक-यांना प्राधान्य दिले जाते. या योजनेत आंबा, सीताफळ, पेरू, लिंबू आदी फळांचा समावेश आहे. लातूर जिल्ह्यातील निवडक गावांमध्ये हवामान बदलाला तोंड देण्यासाठी पोकरा अंतर्गत फळबाग लागवडीला विशेष प्रोत्साहन आणि आर्थिक मंजुरी दिली जाते. बागायतदार शेतक-यांनी फळबागांवर मोठा खर्च केला. सिंचनाची सुविधा निर्माण केली. परंतु, दुष्काळामुळे बागायतदारांच्या सर्व प्रयत्नांवर दुष्काळाने झडप टाकली आहे. बागायतदारांचा खर्च मोठा. त्यामुळे नूकसानही त्याच पटीत झाले आहे. मात्र, शासनाकडून फळबागांचे पंचनामे तितक्या गांभीर्याने होताना दिसत नसल्याने बागायतदारांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
















