जळगाव : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे सोनं अन् चांदीच्या किमतीत उच्चांकी वाढ नोंदवण्यात आली आहे. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये सलग तिस-या दिवशी प्रचंड मोठी वाढ झाली. सोन्याच्या दरामध्ये तब्बल ७ हजार ५०० रुपयांची तर चांदीच्या दरामध्ये तब्बल दहा हजार रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. सोन्याचे दर जीएसटीसह १ लाख ५९ हजार ६५० रुपयांच्या तर चांदीचे दर ३ लाख ३२ हजार ६५० रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकीवर पोहोचले आहेत. सलग तीन दिवसांपासून सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये तेजी असून दराने आजपर्यंतचे विक्रम मोडले आहेत.
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने नवीन उच्चांक करणा-या सोने आणि चांदीच्या दराने बुधवारी आणखी नवे रेकॉर्ड केले. दोन्ही धातूंनी ऐतिहासिक उंची गाठल्यानंतर पुन्हा दरवाढीच्या भीतीने ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिकांची पळापळ झाली. ग्रीनलँडवर कब्जा करण्याच्या चर्चेसोबतच अमेरिका युरोपीय देशांवर टॅरिफ वॉर लादत आहे. या जागतिक घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर अनिश्चितता वाढली असून, त्याचा थेट परिणाम सोने आणि चांदीच्या किमतींवर दिसून येत आहे. याशिवाय, जगभरात चांदीची भौतिक कमतरता जाणवत असल्याने चांदीच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे.
सोने आणि चांदी या पारंपरिकरीत्या सुरक्षित गुंतवणूक मानल्या जातात. देशांतर्गत किंवा जागतिक स्तरावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली की गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोने-चांदीकडे वळतात. लग्नसराईच्या काळात सोने आणि चांदीची मागणी कायम असली, तरी वाढलेल्या किमतींमुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी टाळत आहेत.

