लंडन : वृत्तसंस्था
फुफ्फुसांचा कर्करोग हा जगभरातील कर्करोगाच्या सर्वांत सामान्य प्रकारांपैकी एक असून, तो मृत्यूचे प्रमुख कारण ठरत आहे. २०२२ च्या आकडेवारीनुसार सुमारे २५ लाख लोकांना या आजाराचे निदान झाले आणि १८ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. आता ब्रिटनमधील संशोधकांच्या एका पथकाने रक्ताच्या चाचणीचे एक नवीन तंत्र विकसित केले आहे. यामुळे रिअल टाईममध्ये फुफ्फुसांच्या कर्करोगाचे निदान होऊ शकणार आहे.
जगभरात तंबाखूमुळे होणा-या कर्करोगाचे प्रमाण जास्त असले तरी गेल्या काही दशकांत धूम्रपानाचे प्रमाण कमी होत आहे. धूम्रपान करणा-यांची संख्या घटत असतानाच कधीही धूम्रपान न केलेल्या व्यक्तींमध्येही आज फुफ्फुसांच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. आता फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या एकूण प्रकरणांपैकी १० ते २० टक्के रुग्ण असे आहेत, ज्यांनी कधीही धूम्रपान केलेले नाही. त्यामुळे याचे निदान वेळेत होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
ब्रिटनमधील संशोधकांच्या एका पथकाने रक्ताच्या चाचणीचे एक नवीन तंत्र विकसित केले आहे. यामुळे रिअल टाईममध्ये फुफ्फुसांच्या कर्करोगाचे निदान होऊ शकणार आहे. निदानातील विलंब टाळून रुग्णांवर वेळीच उपचार करण्यासाठी ही चाचणी महत्त्वाची मानली जात आहे. युनिव्हर्सिटी हॉस्पिटल्स ऑफ नॉर्थ मिडलँडस् एनएचएस ट्रस्ट (यूएनएचएम), कील युनिव्हर्सिटी आणि लफबरी युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी फूरियर ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड मायक्रोस्पेक्ट्रोस्कोपी या तंत्राचा वापर करून रुग्णाच्या रक्तातील कर्करोगाची एक पेशी शोधून काढली आहे. हे तंत्र प्रगत इन्फ्रारेड स्कॅनिंग आणि संगणकीय विश्लेषणाचा वापर करून कर्करोगाच्या पेशींच्या विशिष्ट केमिकल फिंगरप्रिंटवर लक्ष केंद्रीत करते.
यूएनएचएममधील ऑन्कोलॉजी तज्ज्ञ आणि संशोधनाचे मुख्य लेखक प्रोफेसर जोसेप सुले-सुसो म्हणतात, या पद्धतीमुळे रुग्णांना लवकर निदान, वैयक्तिक उपचार आणि कमीत कमी शस्त्रक्रियांचा पर्याय मिळू शकतो. मुख्य म्हणजे भविष्यात हे तंत्र फुफ्फुसांव्यतिरिक्त इतर अनेक प्रकारच्या कर्करोगांसाठीदेखील वापरले जाऊ शकते. सर्क्युलेटिंग ट्यूमर सेल्स (सीटीसी) या कर्करोगाच्या अशा पेशी आहेत, ज्या मुख्य ट्यूमरपासून वेगळ््या होऊन रक्तप्रवाहात मिसळतात. या पेशींद्वारे आजाराची प्रगती कशी होत आहे आणि उपचारांचा किती परिणाम होत आहे, याची महत्त्वाची माहिती मिळू शकते. या पेशींमुळेच कर्करोग शरीराच्या इतर भागांत पसरतो. सध्या सर्क्युलेटिंग ट्यूमर सेल्स शोधण्याच्या पद्धती गुंतागुंतीच्या, महागड्या आणि वेळखाऊ आहेत. तसेच रक्तातील प्रवासादरम्यान या पेशी स्वत:चे गुणधर्म बदलत असल्याने सध्याच्या चाचण्यांमध्ये त्या कधी-कधी सापडत नाहीत. त्यामुळे नवी चाचणी महत्त्वाची मानली जात आहे.
रक्ताच्या नमुन्यावर
इन्फ्रारेड किरणांचा मारा
संशोधकांनी विकसित केलेल्या या पद्धतीत रक्ताच्या नमुन्यावर इन्फ्रारेड किरणांचा मारा केला जातो. हे किरण टीव्ही रिमोटमधील किरणांसारखेच असतात. मात्र, अधिक शक्तीशाली असतात. वेगवेगळी रसायने इन्फ्रारेड प्रकाश वेगवेगळ््या प्रकारे शोषून घेतात. कर्करोगाच्या पेशींचा प्रकाश शोषून घेण्याचा एक विशिष्ट नमुना असतो, ज्याला केमिकल फिंगरप्रिंट म्हटले जाते. संगणकीय विश्लेषणाद्वारे हा डेटा तपासून रक्तामध्ये कर्करोगाच्या पेशी आहेत की नाही, हे त्वरित ओळखता येते.

