वर्धा : सोमय्या सोमवारी (ता. १६) वर्धा जिल्ह्यात गेले होते. दाखल्यांची फाईल तपासण्यासाठी ते चक्क उपजिल्हाधिकारी यांच्या खुर्चीत जाऊन बसले. त्यांचा हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमय्या यांना अधिका-यांच्या खुर्चीत जाऊन बसण्याचा कोणी अधिकार दिला? असा सवाल केला असून ‘बिन पगारी फुल अधिकारी’ अशा शब्दांत निषेध नोंदवला आहे.
दरम्यान, भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सध्या मिशन रोहिंग्या हाती घेतले आहे. ते प्रत्येक जिल्ह्यात जाऊन किती बांगलादेशी मुस्लिमांना जन्माचे दाखले दिले याचा शोध घेत आहेत. त्यांच्यामुळे अकोला, अमरावती व नागपूर या शहरातील विशिष्ट कालावधीत महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या दाखल्यांना स्थगिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला होता. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्वाधिक खासदार निवडून आले होते. सुमारे एक टक्का मते आघाडीच्या उमेदवारांना पडली होती. पराभवाचे मंथन व विश्लेषण करताना मुस्लिमांची बहुतांश मते ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पडल्याचे भाजपच्या निदर्शनास आले होते. याच्या खोलात जाऊन शोधाशोध करत असताना अनेक बांगलादेशी रोहिंग्यांना जन्माचे दाखले देऊन मतदार करण्यात आले असल्याची शंका भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केली होती.
यावरून भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये मोठा वाद झाला होता. भाजपने यास ‘व्होट जिहाद’ असे संबोधून उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली होती. दुसरीकडे केंद्रात भाजपची सत्ता असताना रोहिंगे भारतात आले कसे? असा सवाल करून काँग्रेसने भाजपलाच धारेवर धरणे सुरू केले होते.
विधानसभेच्या निवडणुकीत यावरून मोठे राजकारण तापले होते. यानंतर किरीट सोमय्या कामाला लागले. त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन शोधमोहीम हाती घेतली. अद्यापही ती सुरूच आहे. विशेष म्हणजे ते एकटेच जिल्ह्याजिल्ह्यात जातात. अधिका-यांसोबत चर्चा करून आकडेवारी घेतात. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत त्यांनी आतापर्यंत दौरा केला आहे.
सोमवारी ते वर्धा जिल्ह्याच्या दौ-यावर होते. यावेळी ते उपजिल्हाधिकारी यांच्या खुर्चीत जाऊन बसल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी लगेच याची दखल घेऊन ट्विट केले. किरीट सोमय्या यांना कोणी अधिकार दिले, ते दिले नसतील तर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी ट्विट केली आहे.