तेलअवीव : वृत्तसंस्था
इस्रायलने २६ डिसेंबर रोजी सोमालीलँडला एक स्वतंत्र देश म्हणून अधिकृतपणे मान्यता दिली. असा निर्णय घेणार इस्रायल हा पहिला देश ठरला आहे. इस्रायलच्या या निर्णयानंतर मुस्लिम देशांचा संताप वाढत आहे. जगभरातील २१ देशांनी या निर्णयाविरोधात संयुक्त निवेदन जारी करून विरोध दर्शवला आहे.
सोमालीलँड आफ्रिकेच्या हॉर्न प्रदेशात स्थित आहे. या देशाने १९९१ मध्ये सोमालियापासून स्वातंत्र्याची घोषणा केली होती आणि तेव्हापासून आंतरराष्ट्रीय मान्यतेसाठी प्रयत्न करत होता. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सोमालीलँडचे अध्यक्ष अब्दिरहमान मोहम्मद अब्दुल्लाही यांच्यासोबत संयुक्त घोषणेवर स्वाक्षरी केली.
सोमालीलँडच्या अध्यक्षांनी याला ऐतिहासिक क्षण म्हटले आणि सांगितले की, हा निर्णय मध्य पूर्व आणि आफ्रिकेत शांतता आणि समृद्धीला प्रोत्साहन देईल. पाच मुद्द्यांमध्ये मुस्लिम देशांनी विरोध दर्शवला. इस्रायलच्या विरोधात जॉर्डन, इजिप्त, अल्जेरिया, कोमोरोस, जिबूती, गांबिया, इराण, इराक, कुवेत, लिबिया, मालदीव, नायजेरिया, ओमान, पाकिस्तान, पॅलेस्टाईन, कतार, सौदी अरेबिया, सोमालिया, सुदान, तुर्कस्तान, येमेन यांनी विरोध दर्शवला आहे. यासोबतच ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशननेही निवेदन जारी करून आक्षेप नोंदवला आहे.

