जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील लाळी खुर्द शिवारात अज्ञात इसमाने दि १२ सप्टेंबरच्या मध्यरात्री ५ सोयाबीनच्या गंजींना आग लागली . या आगीमध्ये पाचही गंजी पूर्णपणे जळून खाक झाल्या. या घटनेमुळे लाळी खुर्द येथील पाच शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे .
जळकोट तालुक्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती आहे या परिस्थितीत लाळी खुर्द येथील काही शेतक-यांनी आपल्या सिंचन विहिरीचे पाणी देऊन सोयाबीन पीक वाढवले होते. यानंतर आठ दिवसापूर्वीच सोयाबीन पिकाची कापणी करून सोयाबीनच्या गंजी रचून ठेवल्या होत्या मात्र अज्ञाताने दि १२ सप्टेंबर रोजी रात्री बाराच्या दरम्यान या पाचही गंजींना आग लावून दिली . यामध्ये शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. आग लागल्याची माहिती कळतच संबंधित शेतकरी तसेच गावकरी शेतामध्ये धावले परंतु तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते व पूर्ण सोयाबीनच्या गंजी जळून खाक झाल्या होत्या. मनोहर गंगाराम बुर्से, शेषेराव गंगाराम बुर्से , भाऊसाहेब तुकाराम बुर्से, नरसींग मादलापुरे, काशीनाथ धोंडीबा घंटेवाड , या पाच शेतक-यांचे सोयाबीन जुळून खाक झाले आहे.
अनेक बॅग सोयाबीन जळून गेले आहे. यामध्ये सदरील शेतक-यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे .जवळपास ५० एक्कर क्षेत्रावरील सोयाबीनचे नुकसान झाले आहे. दुष्काळात संबंधित शेतक-यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे . जळकोट महसूल प्रशासनाने घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. आग लावणा-याचा शोध घेऊन तात्काळ त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणीही या शेतक-यांनी केली आहे .
















