शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
येथील किशन लहू भोजने या शेतक-याच्या सर्वे नं. १५४ /२५९ मधील शेतात ठेवलेली सोयाबीनची बनीम अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाली. या घटनेत शेतक-याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून गावक-यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
शिरूर अनंतपाळ येथील शेतकरी किशन लहू भोजने यांच्या शेतात नुकतेच कापणी करून सोयाबीनची गंज ठेवण्यात आली होती मात्र शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात कारणाने आग लागली आग विझविण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी केला मात्र तोपर्यंत संपूर्ण बनीम जळून खाक झाली. या आगीत शेतक-याचे अंदाजे ८० ते ९० हजारांपर्यंत नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच तलाठी आर.एस.पाटील घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून नुकसान भरपाईचा अहवाल तहसील कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. गावक-यांनी शासनाने तातडीने या शेतक-याला मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.
















