लातूर : प्रतिनिधी
लातूरच्या आडत बाजारात गेल्या आठ दिवसापूर्वी सोयाबीनचा दर ५ हजार १०५ पर्यत पोहचला होता. त्यामुळे आडत बाजारात सोयाबनची आवकही वाढली होती. शनिवारी आडत बाजारात सोयाबीनची आवक घटनही दरात १०० रूपयाने घसरण झाली आहे. नव्या वर्षात सोयाबीनच्या दरात घसरण झाल्याने शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.
लातूर जिल्हयात गेल्यावर्षी ५ लाख ९१ हजार ६६५ हेक्टरवर खरीपाच्या पेरा झाला होता. या मध्ये ४ लाख ८७ हजार ६६३ हेक्टरवर सोयाबीनचा सर्वाधीक पेरा झाला होता. सोयाबीन काढणीच्या पूर्वी झालेल्या अतिवृष्टीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान केले. त्यामुळे शेतक-यांना जबर आर्थिक फटका बसला. जे सोयाबीन शेतक-यांच्या हाती लागले, त्यास आडत बाजारात हमीभावापेक्षाही कमी दर मिळत आहे.
लातूरच्या आडत बाजारात दि. २५ ऑक्टोबर रोजी ५१ हजार ८८४ क्विंटल सोयाबीनची आवक होऊन सर्वाधिक ४ हजार ३५० रूपये दर मिळाला. दि. ३० ऑक्टोबर रोजी २१ हजार ६५८ क्विंटल सोयाबनची आवक होऊन सर्वाधिक ४ हजार ४९८ रूपये सर्वाधिक दर मिळाला. दि. ४ डिसेंबर रोजी १८ हजार ३२५ क्विंटल सोयाबीनची आवक होऊन सर्वाधिक ४ हजार ६२० रूपये दर मिळाला आहे. दि. २३ डिसेंबर रोजी ८ हजार १८१ क्विंटल सोयाबीनची आवक होऊन सर्वाधिक ५ हजार रूपये दर मिळाला. दि. २७ डिसेंबर रोजी १५ हजार ४३१ क्विंटल सोयाबीनची आवक होऊन ५ हजार १०५ रूपये सर्वाधिक दर मिळाला. तर दि. ३ जानेवारी रोजी ७ हजार ९३५ क्विंटल सोयाबीनची आवक होऊन सोयाबीनचा दर ५ हजार २ रूपयांवर येऊन पोहचला आहे. गेल्या आठ ते दहा दिवसात सोयाबीनच्या दरात घसरण होताना दिसून येत आहे.
…………………..२१……………….

