जळकोट : प्रतिनिधी
खरीप हंगामानंतर शेतमालाच्या दरात स्थिरता येईल, अशी अपेक्षा असतानाच कापूस, सोयाबीन आणि मक्याच्या दरात पुन्हा घसरण झाल्याने बाजारात अस्वस्थता पसरली आहे. जानेवारीत दिसलेली तेजी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच विरून गेली असून कापूस व सोयाबीनचे दर पुन्हा किमान आधारभूत किमतीखाली (एमएसपी) घसरले आहेत.
ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान खरीप पणन हंगाम सुरू असताना बहुतांश शेतमाल एमएसपीखालीच व्यवहारात होता. सरकारी खरेदी प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळे अनेक शेतक-यांनी दरवाढीच्या अपेक्षेने माल रोखून धरला. जानेवारीच्या धक्का दुस-या आठवड्यानंतर कापसाचे कमाल दर प्रतिक्विटल सुमारे ८, ६०० रुपये, तर सरासरी ८,३०० रुपयांपर्यंत पोहोचले. सोयाबीनचे कमाल दर ५,८०० रुपये आणि सरासरी ५,५०० रुपयांपर्यंत वाढले. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात चित्र अचानक बदलले. कापसाचे कमाल दर ७,९५० रुपये आणि सरासरी ७,७०० रुपयांवर आले.
सोयाबीनचे कमाल दर ५, ३०० रुपये तर सरासरी ४, ८५० रुपयांपर्यंत घसरले. सरासरी ७ ते १० टक्क्यांची ही घसरण बाजार निरीक्षकांच्या मते चिंताजनक आहे. अपेक्षित मागणी न मिळाल्याने दर सावरले नाहीत. जागतिक बाजारातील कमी दरामुळे आयातीचा धोका वाढण्याची शक्यता उद्योगांना वाटत आहे.

