लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र सरकारने हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यासाठी ऑनलाइन बुकिंग ३० तारखेपासून सुरू होत असल्याचे जाहीर केले आहे ज्या शेतक-याला ऑनलाइन बुकिंग करायची आहे, अशा शेतक-यांनी स्वत: अंगठा लावून प्रिंट करण्यासाठी खरेदी केंद्रावर जाणे बंधनकारक आहे. त्याच्यानंतर जेव्हा शेतक-याचा नंबर प्रत्यक्षात सोयाबीन घेऊन खरेदी केंद्रावर येण्यासाठी निरोप दिला जातो त्या वेळेला स्वत: शेतक-यांनी पुन्हा एकदा स्वत:च्या हाताचा अंगठा प्रिंट करून देणे गरजेचे आहे, अशी अटी सरकारने टाकली आहे. यामुळे शेतक-यांसमोर आणखी अडचणीचा डोंगर उभा राहिला आहे. सरकार हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करणार आहे. खरे पाहिले असता सरकारने शेतक-यांचा माल बाजारामध्ये व्यापा-यांना खरेदी करता यावा उत्पादन खर्चावर आधारित रास्तभाव शेतक-यांना मिळावा, असे धोरण राबवणे गरजेचे असताना सरकार व्यापारी म्हणून बाजारामध्ये येत आहे मुळात हेच चुकीचे आहे.
सरकार हमीभावाने खरेदी करण्याचे ढोंग करत असते. गेल्यावर्षी ऑनलाईन बुकिंग केलेले लाखो शेतकरी या सोयाबीन विक्रीपासून वंचित राहिले आहे. आठ-आठ दिवस शेतक-यांना खरेदी केंद्रावर पडून राहावे लागले होते. यंदाचा कहर म्हणजे सरकार हमीभावाने खरेदी करणार, असे सांगत आहे. परंतु हे करत असताना शेतक-यांच्या अडचणी मात्र जितक्या जास्त वाढवता येतील तितका प्रयत्न करायला सरकार विसरत नाही. सध्या प्रत्येक खरेदी केंद्रावर प्रिंटर्स देण्यात येणार आहेत. या शेतक-याला ऑनलाइन बुकिंग करायची आहे अशा शेतक-यांनी स्वत: अंगठा लावून प्रिंट करण्यासाठी खरेदी केंद्रावर जाणे बंधनकारक आहे. त्याच्यानंतर जेव्हा शेतक-याचा नंबर प्रत्यक्षात माल घेऊन खरेदी केंद्रावर येण्यासाठी निरोप दिला जातो त्या वेळेला स्वत: शेतक-यांनी पुन्हा एक वेळ स्वत:च्या हाताचा अंगठा प्रिंट करून देणे गरजेचे आहे.
यामधील बरेच अडथळे आहेत. कधी सर्व्हर डाऊन होते तर कधी साईट चालत नाही, अशा अनेक तक्रारी पाचवीला पुजलेल्या आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे वयोवृद्ध शेतकरी, महिला शेतकरी यांना दोन-दोन वेळा खरेदी केंद्रावर पडून राहणे शक्य होणार नाही. वयोवृद्धांच्या अंगठ्याचे ठसे निटपणाने उमटत नाहीत. अंगठ्याचा ठसाच येत नाही म्हणून बुकींग झाली नाही. किंवा सोयाबीनच हमीभावाने विकला गेला नाही तर यास जबाबदार कोण?, असा नवीन प्रश्न शेतक-यांना आता सतावतो आहे.

