लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र सरकारने हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यासाठी ऑनलाइन बुकिंग ३० ऑक्टोबरपर्यंत करुन घेतली. प्रत्येक्ष खरेदी दि. १५ नोव्हेंबर रोजी सुरु होणार होती. परंतू, पोर्टलने खोडा घातल्याने पहिल्या दिवशी सोयाबीनची हमीभावाने खरेदी झाली नाही. जिल्हा मार्केटींग फेडरेशनच्या सोयाबीन खरेदी केंद्रांवरील पोर्टल दुपारी १२.३० वाजता सुरु झाले. त्यामुळे केंद्र संचालकांनी शेड्युलिंग सुरु केली. परिणामी आज सोयाबीनची हमीभावाने प्रत्येक्ष खरेदी सुरु होईल, असे सांगण्यात आले.
यंदा अतिवृष्टीचा मोठा फटका खरीप पिकांना बसला. त्यामुळे सोयाबीनचे उत्पादन घटले. शिवाय भर पावसात सोयाबीनची काढणी झाल्याने दर्जावरही परिणाम झाला आहे. शेतकरी नैसर्गीक संकटाचा सामना करीत असतानाच दुसरीकडे बाजारपेठेतील सोयाबीनचे दरही घटले होते. शेतक-यांची दैनिय अवस्था आणि विरोधकांचा आक्रमकपणा यामुळे सरकारने सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला. दि. ३० ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करुण घेण्यात आली. दि. १५ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष खरेदी सुरु होणार होती. परंतू, पोर्टलने खोडा घातल्याने खरेदी होऊ शकली नाही.
सोयाबीन खरेदी केंद्र सुरु होत असतानाच बाजारपेठेतही सोयोबीनच्या दरात काहींशी वाढ होताना दिसत आहे. हमीभाव खरेदी केंद्रावर ५ हजार ३२८ रुपये प्रति क्विंटलचा दर ठरवून देण्यात आला आहे. असे असले तरी सोयाबीनमधील आर्द्रता, दर्जा या सर्व बाबींचे निकष लावूनच खरेदी केली जाणार आहे. जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयामार्फत सुरु करण्यात आलेल्या केंद्रांवर २१ हजार ५६९ शेतक-यांनी नोंदणी केली आहे. हमीभाव खरेदी केंद्रावर एका शेतक-याला एका दिवसाला ४० क्विंटल सोयाबीन विक्रीची मर्यादा टाकण्यात आली आहे. क्षेत्र कितीही असले तरी दिवसाला फक्त ४० क्विंटलच सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावर घालता येणार आहे.

