सोलापूर – रस्ता सुरक्षेविषयीची जनजागृती आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन व्हावे यासाठी सोलापूरच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने सुरू केलेल्या ‘सुरक्षा कवच’ला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले.
यानिमित्ताने क्रिकेट क्षेत्रातील नामवंत अष्टपैलू खेळाडू व सोलापूरचा सुपुत्र अर्शिन कुलकर्णी याने प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सुरक्षा कवच कक्षला भेट दिली आणि या नावीन्यपूर्ण उपक्रमाची प्रशंसा केली.
प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्या संकल्पनेतून हा कक्ष उभारण्यात आला आहे. रस्ता सुरक्षेची शिकवण ही शालेय वयापासून
झाली पाहिजे हा या ‘सुरक्षा कवच’चा प्रमुख उद्देश आहे.
त्यानुसारच आजपर्यंत एकूण सात हजारांहून जास्त विद्यार्थ्यांनी ‘सुरक्षा कवच’ कक्षास भेट देऊन रस्ता सुरक्षा नियमांचे धडे गिरविले आहेत. या रस्ता सुरक्षा कवच नावीन्यपूर्ण उपक्रमामध्ये रस्ता सुरक्षेचे संदेश देणारे विविध
मनोरंजनात्मक खेळ उभा केले आहेत. यामध्ये रस्ता सुरक्षेची सापशिडी, रस्ता सुरक्षा ट्री, रोड सेफ्टी ओथ वॉल, रस्ता सुरक्षेची शपथ व प्रतिज्ञा यांचा समावेश आहे. आपत्कालीन वाहनांना मार्ग द्या याची जनजागृती करणारे मॉडेल कक्षामध्ये कार्यान्वित आहे.
‘सुरक्षा कवच’ची इमारत ही वाहतुकीच्या नियमांच्या चित्रांनी खास रंगविण्यात आली आहे. हेल्मेट व सीट बेल्टचा वापर करावा यासाठी कक्षाबाहेर सेल्फी पॉइंट उभा केलेला आहे. कार्यालय परिसरातील झाडांवर लावलेले फलक वाहतुकीचे नियम देखील सांगत आहेत.