सोलापूर – भारत हिंदूबहुल देश असूनही अनेक ठिकाणी सरकारीकरण झालेल्या देवस्थानांच्या मालकीच्या भूमी परस्पर विकल्या गेल्याचे उघड झाले आहे, तसेच काही देवस्थान भक्तांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. शासनाने कह्यात घेतलेल्या काही मंदिरांमधील आर्थिक घोटाळे उघडकीस येत आहेत. नुकताच पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या प्राचीन दागिन्यांचे मूल्यांकन आणि त्यांच्या नोंदी नसल्याचे समोर आले आहे. प्रसादाच्या लाडूपासून, गोशाळा, शौचालय, आगाऊ रक्कम यांसह सर्वत्रच अनागोंदी कारभार असल्याचे समोर आले. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानात प्राचीन आणि मौल्यवान सोन्या- चांदीचे दागिने गहाळ झाल्याची घटना नुकतीच समोर आली.
काही वर्षांपूर्वी कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवस्थानातही भूमी आणि दागिने यांत मोठा घोटाळा झाला होता. मंदिरे हिंदूंच्या धर्मशिक्षणाची केंद्रे आणि हिंदूंना चैतन्य पुरवणारी असल्याने ती सरकारीकरणातून मुक्त करून पुन्हा भक्तांच्या ताब्यात देण्यासाठी समिती आंदोलन, निवेदन, याचिका यांसह विविध माध्यमातून लढा देत आहे. यापुढील काळात मंदिरांच्या पैशांवर डल्ला मारणार्यांना शासन होइपर्यंत समितीचा लढा चालू राहील, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे यांनी केले. ते भवानी पेठ येथील जयभवानी प्रशालेच्या मैदानावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित हिंदु राष्ट्र जागृती सभेत बोलत होते.
या सभेत सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, तसेच हिंदु विधीज्ञ परिषदेचे परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनीही मार्गदर्शन केले. या सभेसाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राजकीय पक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांसह आजूबाजूच्या गावातील धर्माभिमानी हिंदू मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी शंखनादानंतर सद्गुरु स्वाती खाडये यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. वेदमूर्ती सचिन व्यंकटेश सवाई गुरुजी, शैलेंद्र जोशीगुरुजी, नंदकुमार शिरसीकरगुरुजी, प्रथमेश क्षीरसागर यांनी वेदमंत्रपठण केले. हिदु जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा सोलापूर जिल्हा समन्वयक . राजन बुणगे यांनी मांडला.
सभास्थळी क्रांतीकारकांची यशोगाथा आणि धर्माचरण यांचे महत्त्व विषद करण्यासाठी बालचमूंनी क्रांतीकारक आणि पारंपारिक वेशभूषा परिधान केलेला बालसंस्कार कक्ष उभारण्यात आला होता. धर्मप्रेमी कु. श्रीविद्या पोगुल, . रमेश झुंझा, . अविनाश जोशी, नागेश मासपत्री, लक्ष्मीनारायण बामणला यांचा या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सभेच्या समारोपप्रसंगी स्वरक्षण प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन हिंदु जनजागृती समितीचे चैतन्य तागडे यांनी केले.