21.6 C
Latur
Sunday, December 8, 2024
Homeसंपादकीयसोशल मीडियाला वेसण!

सोशल मीडियाला वेसण!

‘लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा। ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार।।
जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण।।’ या अभंगात संत तुकाराम महाराजांनी लहानपणाची थोरवी वर्णिली आहे. अंगात मोठेपण आले की त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी कोणतेही दायित्व नसलेले लहानपणच बरे हे त्याकाळी तुकाराम महाराजांनी सांगितले असले तरी वर्तमानात लहानपणच अधिक यातनादायी झाले आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा १४ नोव्हेंबर हा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. बालकांच्या हक्काचा वर्षातील हा एकमेव दिवस असला तरी आज लहान मुलांची स्थिती पाहिल्यास त्यांचे बालपण कुठेतरी हरवत चालल्याचे दिसून येते. लहान मुले हेच देशाचे भविष्य आहे. आजचा बालक उद्याचा नागरिक आहे. तो नेहमी आनंदी, उत्साही आणि सुरक्षित असायला हवा. लहान मुले सुरक्षित तर देश सुरक्षित असे म्हटले जाते.

मुलामुलींना सुरक्षित आणि प्रेमाच्या वातावरणात वाढवले गेले पाहिजे तसेच त्यांना आपले आयुष्य फुलवण्याच्या संधी मिळाल्या पाहिजेत असे पंडित नेहरू यांचे मत होते. विज्ञानाने जग प्रगत झाले आहे. मात्र, याच विज्ञानाने लाभलेल्या मोबाईल, इंटरनेट, व्हीडीओ गेम, केबल टीव्ही यासारख्या साधनांनी मुलांच्या प्रगतीला खीळ घातली आहे, त्यांना वेगळ्याच जगात नेले आहे असे म्हणायची वेळ आली आहे. मित्रांसोबत मैदानी खेळ खेळण्याच्या, पालकांशी गप्पा मारून आपले विचार प्रकट करण्याच्या वयात मुले मोबाईलच्या आभासी जगामध्ये रमताना दिसत आहेत. त्यामुळे बालवयातच मुलांना नेत्रविकार, मनोविकार जडू लागले आहेत. देशासाठी प्राणाचे बलिदान करणारे क्रांतिकारक, समाजसुधारक, राष्ट्रपुरुष हे आजच्या मुलांचे आदर्श नसून कार्टून जगतातील खोटी पात्रे मुलांना आपले आदर्श वाटू लागले आहेत. मुलांचे भवितव्य घडवण्याच्या हेतूने नोकरी-व्यवसायासाठी बाहेर पडणारे आई-बाबा मुलांना उमलत्या वयातच वेळ देत नसल्याने मुलांना त्यांच्याविषयी प्रेम आणि आपुलकीच राहिली नाही.

पर्यायाने पालकांकडून मुलांना संस्कारच मिळत नाहीत. संस्कारच नसल्याने हल्लीची मुले पालकांना, मोठ्या व्यक्तींना सर्रास उलट उत्तर देताना, उद्धटपणे वागताना थोडासा सुद्धा विचार करत नाहीत. व्हीडीओ गेम्स, रील्स पाहून लहान मुले मनोविकाराने ग्रासली जात आहेत. मोबाईलमुळे जग मुठीत आले आहे हे खरे असले तरी बालवयातच मुलांना अनैतिक गोष्टींचे शिक्षण मिळत आहे. मोबाईलमुळे मुलांना नको त्या गोष्टींचे शिक्षण मिळत आहे. गत काही वर्षांत लहान मुलीांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्येही कमालीची वाढ झाली आहे. या सा-यांचा परिपाक म्हणून बालगुन्हेगारीचा आलेखही दिवसागणिक वाढत चालला आहे. लहान मुले जरा काही मनाविरुद्ध घडले, घरात कोणी बोलले, अपमान केला, परीक्षेत कमी गुण मिळाले की आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊ लागले आहेत. आज बालमजूर प्रतिबंधक कायदा अस्तित्वात असला तरी कितीतरी किराणा मालाच्या दुकानात, चहाच्या टपरीवर, हॉटेल्समध्ये, छोट्या कारखान्यात लहान मुले काम करताना दिसतात. मोठ्या शहरात तर लहान मुलांकडून भीक मागून घेणे हा व्यवसाय बनला आहे.

हे सारे पाहिल्यानंतर मुलांचे हरवत चाललेले बालपण प्रकर्षाने लक्षात येते आणि प्रश्न पडतो की, हरवत चाललेले बालपण त्यांना पुन्हा मिळवून देण्याचे दायित्व नक्की कोणाचे?… पालकांचे, समाजाचे की सरकारचे? मुलांच्या हातात मोबाईल द्यायचा की नाही हा आज मोठा गंभीर प्रश्न बनला आहे. हा केवळ भारतापुरता मर्यादित प्रश्न नाही तर तो सा-या जगाला भेडसावतो आहे. त्या अनुषंगाने ऑस्ट्रेलियाने पहिले पाऊल उचलले आहे. ऑस्ट्रेलियात १६ वर्षांखालील मुलांना समाजमाध्यमे वापरण्यावर बंदी घालणारा कायदा गुरुवारी मंजूर करण्यात आला. हा कायदा फेसबुक, इन्स्टाग्रामपासून स्नॅॅपचॅटसारख्या सर्व समाजमाध्यमांना लागू आहे. हा कायदा मोडणा-या कंपन्यांना ३२ दशलक्ष अमेरिकन डॉलर इतक्या दंडाची तरतूद नव्या कायद्यात करण्यात आली आहे. आतापर्यंत अनियंत्रित समाजमाध्यमांमुळे लहान मुलांवर होणा-या दुष्परिणामांची जगभरात केवळ चर्चा होत होती.फ्रान्ससह अमेरिकेतील काही राज्यांमध्ये पालकांच्या परवानगीने समाजमाध्यमात खाती उघडण्याची मुलांना परवानगी आहे.

ऑस्ट्रेलियाने गुरुवारी केलेला कायदा हा सर्वांत कडक असून तो अनेक देशांसाठी मार्गदर्शक ठरू शकेल असे मानले जात आहे. ऑस्ट्रेलियाच्या सेनेटमध्ये ‘समाजमाध्यम किमान वयोमर्यादा विधेयक’ ३४ विरुद्ध १९ मतांनी मंजूर करण्यात आले. कनिष्ठ सभागृहात (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह) बुधवारी १०२ विरुद्ध १३ अशा मताधिक्याने या विधेकावर मान्यतेची मोहर उठवण्यात आली होती. नव्या कायद्यानुसार १६ वर्षांखालील मुलांना टिकटॉक, फेसबुक, स्नॅपचॅट, रेडिट, एक्स(ट्विटर) आणि इन्स्टाग्रामच्या समाजमाध्यमांवर खाती उघडण्यास बंदी असेल. याची अंमलबजावणी करण्यासाठी कंपन्यांना एक वर्षाचा कालावधी देण्यात आला असून त्यानंतर मात्र कंपन्यांना मोठ्या रकमेचा दंड भरावा लागेल. नव्या कायद्याबाबत ऑस्ट्रेलियात मतमतांतरे आहेत. बालहक्क संघटनांनी कायद्याला विरोध केला असला तरी पालकांकडून मात्र नव्या कठोर नियमांचे स्वागत केले जात आहे.

भारतातही मीडियावर बंदी घालणा-या कायद्याची गरज आहे. समाजमाध्यमांच्या अति वापरामुळे मुलांचे केवळ मानसिक आरोग्यच नाही तर शारीरिक आरोग्यही धोक्यात आले आहे. कोवळ्या वयातच त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. अजाणत्या वयात समाजमाध्यमातील चौफेर भडिमारामुळे अनेक अनैतिक गोष्टींचे ज्ञान त्यांना मिळू लागले आहे. त्यामुळे त्यांचे भावविश्वच कोलमडून जात आहे. मुलांचे मानसिक स्वास्थ्य बिघडल्याने त्यांची मैदानी खेळांची आवड कमी होत चालली आहे. आपल्या देशाने विविध तंत्रज्ञानामध्ये साधलेली प्रगती निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यामुळे माणसाचे चंद्रावर जाण्याचे स्वप्न सत्यात उतरू शकेल परंतु काही विघ्नसंतोषी लोक या तंत्रज्ञानाचा गैरवापर करण्याचीही भीती आहे. सोशल मीडियाची स्थितीही तशीच झाली आहे. या माध्यमातून प्रचंड ज्ञान मिळू शकते परंतु त्याच्या गैरवापराचेही धोके आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR