22.9 C
Latur
Monday, July 7, 2025
Homeलातूरसौर कृषी पंपांच्या समस्या सुटणार

सौर कृषी पंपांच्या समस्या सुटणार

लातूर : प्रतिनिधी
राज्यात विविध योजनांमध्ये बसविण्यात आलेल्या एकूण सौर कृषी पंपांची संख्या ५ लाख ६५ हजारांवर पोहोचली असून महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. आणखी पाच लाख सौर कृषी पंप बसविण्यात येणार आहेत. सौर कृषी पंप बसविल्यानंतर त्यात काही बिघाड होण्याच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी महावितरणने पुढाकार घेतला असून शेतक-यांना घरबसल्या फोनवरून अथवा ऑनलाईन तक्रार करता येईल, अशी सुविधा उपलब्ध केली आहे. शेतक-यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले आहे.
मे महिन्याच्या अखेरीस आलेल्या वादळी वा-यांमुळे आणि मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स कोसळून नुकसान झाले. अशा प्रकारच्या विविध समस्या सोडविण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. सौर कृषी पंप बसविल्यानंतर पंप चालत नसणे, सौर पॅनेलची नासधूस होणे, सौर ऊर्जा संच काम करत नाही, सौर पॅनेल्सची किंवा पंपाची चोरी होणे अथवा  पंपातून कमी दाबाने पाणी येणे अशा विविध तक्रारी शेतकरी करू शकतील. सौर कृषी पंप संचाचा विमा उतरविण्यात आला  आहे.
लाभार्थी शेतक-यांना महावितरणच्या टोल फ्री नंबरवर फोन करून किंवा महावितरणच्या संबंधित वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करून किंवा थेट संबंधित पुरवठादार कंपनीच्या वेबसाईटवर नोंदणी करून तक्रार नोंदविता येईल. तक्रार नोंदविताना शेतक-याने सौर कृषी पंपाचा लाभार्थी क्रमांक लिहिला तर पुरेसे आहे. शेतकरी आपला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक लिहूनही तक्रार करू शकतात. आपला जिल्हा, तालुका, गाव व स्वत:चे नाव अशी माहिती देऊनही तक्रार करता येईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR