वाहन फरार, तरुणाची ओळख पटेना
लातूर : प्रतिनिधी
शहरातील स्क्रॅप मार्केट परिसरात दि. १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास वाहनाने एका तरुणाला चिरडले. वाहनाचे टायर त्या तरुणाच्या डोक्यावरून गेल्याने तरुण जागीच मरण पावला.
स्क्रॅप मार्केट परिसरातून पायी चालत जाणारा तरुण चारचाकी वाहनाच्या मागच्या टायरखाली आला. वाहनाचे मागचे टायर तरुणाच्या डोक्यावरुन गेल्याने तो तरुण जागीच मरण पावला. अपघातानंतर वाहन फरार झाले. तरुणाच्या डोक्याचा भाग चेंदामेंदा झाला. त्यामुळे त्या तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. दरम्यान, गांधी चौक पोलिसांनी घटनास्थळी पोचून मयत तरुणाचे शव विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाला पाठवून दिले आहे.
पोलिसांनी स्क्रॅप मार्केटच्या परिसरातील काही सीसीटीव्ही खंगाळल्या आहेत. परंतु अद्यापही वाहन आणि तरुणाची ओळख पटू शकली नाही. रविवार असल्यामुळे स्क्रॅप मार्केटमधील बहुतांश दुकाने बंद होती. त्यामुळे आज पोलिस स्क्रॅप मार्केटमधील सीसीटीव्ही फुटेज खंगाळून तरुणाच्या डोक्यावरून गेलेले वाहन व तरुणाची ओळख पटविण्याचा प्रयत्न करतील.
















