नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अमेरिकन अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क यांची कंपनी स्टारलिंक आता भारतात उपग्रह-आधारित इंटरनेट सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, स्टारलिंकला भारतात सेवा सुरू करण्यासाठी एकात्मिक परवाना देण्यात आल्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे देशातील दुर्गम खेडी आणि शहरांमधील इंटरनेट कनेक्टिव्हिटीमध्ये मोठी क्रांती घडण्याची शक्यता आहे.
गेटवे ही एक अशी संरचना आहे, जी उपग्रहांकडून येणारा डेटा भारतात आणून त्याला देशाच्या इंटरनेट नेटवर्कशी जोडते. स्टारलिंकच्या प्रवेशामुळे भारतीय दूरसंचार क्षेत्रात स्पर्धा वाढणार आहे. भारती समूहाच्या पाठिंब्याने कार्यरत असलेली यूटेलसॅट वनवेब आणि जिओ एसईएस या कंपन्यांनाही उपग्रह सेवा सुरू करण्यासाठी स्पेक्ट्रम वाटपाची प्रतीक्षा आहे.
पारंपरिक सॅटेलाइट इंटरनेटमध्ये स्पीड आणि लेटन्सी (डेटा पोहोचायला लागणारा वेळ) यांसारख्या समस्या येतात. मात्र, स्टारलिंकची कार्यपद्धती पूर्णपणे वेगळी आहे. स्टारलिंक पृथ्वीच्या खालच्या कक्षेत हजारो लहान उपग्रहांचे जाळे तयार करते. हे उपग्रह एकमेकांशी संवाद साधून हाय-स्पीड आणि अत्यंत कमी लेटन्सी (विलंब) असलेले इंटरनेट पुरवतात. यामुळे व्हिडिओ कॉलिंग, ऑनलाइन गेमिंग आणि स्ट्रीमिंग यांसारख्या सेवा कोणत्याही अडथळ्याशिवाय वापरता येतात.

