लातूर : एजाज शेख
भारतीय रेल्वे प्रशासनांतर्गत येणा-या लातूर शहरातील मराठवाडा रेल्वे बोगी कारखान्यांतर्गत स्थापन केलेला मॅन्युफॅक्चरिंग युनिट सध्या रश्यिाातील कीनेट रेल्वे सोल्युशन लि. या ‘जेव्ही’मार्फत गेल्या दीड वर्षांपासून चालविण्यात येत आहे. परंतु, मागील दीड वर्षांपासून या प्रकल्पात स्थानिक तंत्रज्ञान पदविका आणि पदवीधर(अनुभवी/विनाअनुभवी) उमेदवारांना डावलून कीनेट प्रशासनाकडून गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश तसेच दक्षीण भारतातील उमेदवारांना प्राधान्य दिले जात आहे. हा लातूरच्या बेरोजगार युवकांना रेल्वे बोगी कारखान्याचा पहिला झटका मानला जात असल्याने स्थानिक बेरोजगार युवकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
लातूर तसेच मराठवाड्यातील स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगार आणि उद्योग व्यवसायात संधी निर्माण व्हावी, या उद्देशाने भारत सरकारने लातूरसारख्या ठिकाणी रेल्वे बोगी कारखाना सुरु केला. परंतू, कीनेट रेल्वे सोल्युशन लि. मार्फत स्थानिक युवकांना डावलून परराज्यातील युवकांना प्राधान्य दिले जात आहे.
कीनेट रेल्वे सोल्युशन लि. कंपनीने दीड वर्षात फक्त १५० लोकांना रोजगार दिला आहे. त्यात लातूर आणि परिसरातील ८ ते १० उमेदवार आहेत. त्यातील निम्मे उमेदवार हे कंत्राटी (फिक्स टर्म) एका वर्षाच्या कराराअंतर्गत काम करीत आहेत. २० सप्टेंबर २०२५ रोजी कीनेट रेल्वे सोल्युशन लि. कंपनीने लातूर जिल्ह्या बाहेरील ५२ उमेदवारांना प्रतिक्षा मुलाखतीसाठी बोलावले होते. त्यात लातूरचे १-२ उमेदवार होते. त्यांनाही आजपर्यंत या कंपनीने कोणताही संपर्क केला नाही. सर्व मुख्य, वरिष्ठ पदे भरती आहेत. परंतु, त्यात लातूर आणि परिसरातील अनुभवी युवकांना प्राधान्य देण्यात आले नाही.
















