मर्सिया : वृत्तसंस्था
युरोपमधील प्रमुख देशांपैकी एक असलेल्या स्पेनमधील एका शहरामध्ये मुस्लिमांना ईद उल फित्र आणि ईद उल अजहा यासारखे धार्मिक सण सार्वजनिक ठिकाणी साजरे करण्यास मनाई करण्यात आली आहे. ही बंदी दक्षिण-पूर्व स्पेनमधील मर्सिया येथील जुमिला येथे स्थानिक प्रशासनाकडून लागू करण्यात आली आहे. आता या बंदीवरून वादाला तोंड फुटले असून, स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
मर्सिया शहरामध्ये लावण्यात आलेले हे निर्बंध स्पेनमधील कुठल्याही शहरात लागू करण्यात आलेले अशा प्रकारचे पहिलेच निर्बंध आहेत. हे निर्बंध लागू करण्याचा प्रस्ताव पिपल्स पार्टीने मांडला होता. या प्रस्तावावर झालेल्या मतदानावेळी उजव्या विचारसरणीचा वॉक्स पक्ष अनुपस्थित राहिला, तर स्थानिक डाव्या पक्षांनी या प्रस्तावाला विरोध केला. मात्र विरोधानंतरही हा प्रस्ताव पारित केला गेला.
दरम्यान, या निर्णयाला तीव्र विरोध होत असून आता या प्रस्तावाला आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे. हा प्रस्ताव स्पेनच्या राज्यघटनेतील कलम १६चे उल्लंघन करतो. या कलमामधील तरतुदींनुसार नागरिकांना आणि समुदायांना विचारसरणी, धर्म आणि पूजा यांच्या स्वातंत्र्याची हमी देण्यात आली आहे.

