16.8 C
Latur
Saturday, December 6, 2025
Homeअंतरराष्ट्रीयस्पेस स्टेशनहून परतलेल्या उंदरांचा चीनमध्ये अभ्यास

स्पेस स्टेशनहून परतलेल्या उंदरांचा चीनमध्ये अभ्यास

बीजिंग : वृत्तसंस्था
चीनच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ कार्यक्रमातील एक महत्त्वाचा टप्पा पार पडला असून, जीवशास्त्र प्रयोगांसाठी अंतराळात पाठवण्यात आलेले चार उंदीर पृथ्वीवर सुखरूप परतले आहेत. चीनच्या स्पेस स्टेशनमधून ‘शेनझो-२१’ अंतराळ यानाच्या माध्यमातून हे नमुने परत आले आणि शनिवारी पहाटे ते चिनी वैज्ञानिकांकडे पुढील संशोधनासाठी सुपूर्द करण्यात आले.

जीवांचे अंतराळ वातावरणाशी असलेले अनुकूलन आणि ताण प्रतिक्रिया समजून घेण्यासाठी हे चार उंदीर महत्त्वाचे आहेत. संशोधक आता त्यांच्या वर्तनाचे तसेच प्रमुख शारीरिक आणि जैवरासायनिक निर्देशकांचे परीक्षण बीजिंगमधील स्पेस अ‍ॅप्लिकेशन इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी सेंटरमधील संशोधक करतील. या अभ्यासातून अंतराळात सजीवांवर होणा-या परिणामांबद्दल महत्त्वपूर्ण वैज्ञानिक माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

वैज्ञानिक परत आलेल्या जीवशास्त्र पेशी नमुन्यांवर ‘प्रोटीओमिक्स’ आणि ‘ट्रान्स्क्रिप्टोमिक सिक्वेन्सिंग’ सारख्या अत्याधुनिक चाचण्या करतील. सूक्ष्म-गुरुत्वाकर्षणामुळे मानवी शरीरावर होणारे परिणाम अभ्यासून, संबंधित आजारांवर प्रतिबंध आणि उपचारांसाठी नवे मार्ग शोधले जातील. गुरुत्वाकर्षणामुळे वाढीवर कसा परिणाम होतो, तसेच अंतराळात कार्यक्षमता कशी असते, याचा अभ्यास होईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR